चिपळूण:-चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात 22 जनावरांची तस्करी करणारा ट्रक भाजप पदाधिकाऱ्यानी पकडल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे.
बुधवारी भाजप पदाधिकारी विनोद भूरण व कार्यकर्त्यांना गुरे वाहतूकीचा ट्रकचा पाठलाग करुन पकडला होता. शिवाय याची माहिती अलोरे-शिरगाव पोलिसांना दिल्यानुसार कुंभार्ली घाटातील तपासणी नाका ठिकाणी या ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या हौद्यामध्ये दाटीवाटीने व आखूड दोरीने बांधून ठेवलेली 22 जनावरे असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर पोलीसांनी ट्रक ताब्यात घेत कराड येथील ट्रक चालक शहाजी नलवडे याला अटक केली होती. शिवाय या प्रकरणी खेर्डी येथील इक्बाल खेरटकर यांच्यासह अन्य दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी या तिघानाही ताब्यात घेत त्याना अटक केली आहे. गुरे वाहतुक प्रकरणी आतापर्यंत चौघाना अटक करण्यात आली असून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे.