दादा महिला शिक्षणासाठी आग्रही – राजेंद्रकुमार वारे
सावर्डे:-खेडोपाड्यातील कष्टकरी, सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी स्व.गोविंदरावजी निकम यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. शिक्षणानेच मानवाची प्रगती शक्य आहे याची जाणीव असलेल्या दादांनी प्रत्येक घरातील महिला शिकली पाहिजे व तिने घराचा उद्धार केला पाहिजे या दूरदृष्टीने महिला सबलीकरणाची सुरुवात केली असे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक,शिक्षण व सहकारमहर्षी स्व. गोविंदरावजी निकम यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दादांनी केलेल्या कार्याची ओळख व शिक्षण क्षेत्रात कोकण प्रांताला दिलेली नवी दिशा याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून श्री अमित साळवी व श्री जयंत काकडे यांनी तयार केलेल्या सचित्रभीतीपत्रकाचे अनावरण विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या शुभहस्ते स्व.गोविंदरावजी निकम यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले. श्रावणी राठोड हिने दादांचे बालपण, शिक्षण याविषयी माहिती दिली. शिक्षक मनोगतात जयंत काकडे यांनी त्यांच्या शैक्षणिक, सहकार व राजकीय कार्याचा आढावा घेताना दादांनी अपार निष्ठेने स्थापन केलेल्या सह्याद्रीचा नावलौकिक शिक्षण घेऊन वाढवावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित साळवी यांनी केले .मंगेश दाते यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.