रत्नागिरी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शुक्रवारी (ता. २४) मोठे खिंडार पडणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद माजी सदस्य, विभागप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, अन्य कार्यकर्ते शिवेसनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोठा पक्षप्रवेश होणार आहे.
अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यातच उबाठा शिवसेनेला उतरती कळा लागली. त्यानंतर काही निष्ठावंतांनी शिवसेनेला उभारी देण्याचा प्रयत्न केला. लोकसभेत कार्यकर्त्यांनी
जोमाने उभं राहण्याचा प्रयत्न केला. विधानसभेला रत्नागिरीतली राजकीय परिस्थिती बदलली. निष्ठावंताला डावलून भाजपमधून आलेल्या बाळ माने यांना संधी दिल्याने उबाठाच्या शिवसैनिकांचा धीर खचला. या काळात उदय सामंत, किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात शिवसेना जोमाने वाढत होती. शासकीय योजनांमुळे शिवसेनेला ताकद मिळाली. या घडामोडीत उबाठाचे कार्यकर्ते विकासपासून वंचित राहिले. भविष्यात उभारी घ्यायची असले तर सत्तेशिवाय पर्याय नाही, हे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे सत्तेत असलेल्या आणि एकाच विचाराच्या शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला, अशी माहिती बंड्या साळवी यांनी दिली.