सीसीटिव्हीसह इतर साहित्याचे मोठे नुकसान
चिपळूण : शहरातील एका भागात आयोजित कबड्डीच्या अंतिम सामन्यात दोन संघात जोरदार हाणामारी झाली. याने एकच छजबळ उडाली. येथे लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे नुकसान झाल्याने आयोजकानी दोन्ही संघांना बक्षिसे न देता रिकाम्या हाताने माघारी पाठवले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवस या भव्य स्पर्धा सुरू होत्या, दोन दिवसांपूर्वी या स्पर्धेचे दोन उपांत्य व त्यानंतर अंतिम सामना होता, अंतिम सामना तालुक्यातील कबड्डीसाठी प्रसिद्ध असलेल्या भागातील दोन संघामध्ये झाला शेवटच्या क्षणी विजय ठरवणाऱ्या गुणावरून मैदानातच या दोन संघामध्ये वाद सुरू झाला. पंचानी एका संघाला विजयी घोषित केल्यानंतर त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. ते नाचत नाचत मैदानात आल्यावर दुसऱ्या संघाच्या एकाला धक्का लागला. यातून वादाला सुरुवात झाली. शिवीगाळपर्यंत असणारा हा वाद, बघता-बघता इतका विकोपाला गेला अन् दोन्ही संघामध्ये तुफान मारामारी झाली. कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे जाऊन हा वाद मिटवला.
मात्र या साऱ्या प्रकारात स्पर्धेसाठी लावण्यात आलेले कॅमेरे तुटले. तसेच अन्य साहित्याचे नुकसानही झाले त्यातच मंडळाने नियोजनबद्ध आयोजन केले असतानाही त्यांची बदनामी झाली. त्यामुळे दोन्ही संघांना बक्षिसे न देता रिकाम्या हाताने माघारी पाठवण्यात आले. पहिल्या क्रमांकासाठी २५ हजार तर दुसऱ्या क्रमांकासाठी २० हजार रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. स्पर्धेतील तृतीय व चतुर्थ क्रमांक प्राप्त, संघाना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
खेडमधील वादाचा वचपा
दोन संघांमध्ये काही दिवसापूर्वी खेड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वाद झाला होता. याच वादातून येथे ही मारामारी झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकारानंतर आयोजक मंडळाने जिल्हा कबड्डी असोसिएशनला पत्र दिले असून संघांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.