लांजा:- येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुधीर रामचंद्र भोसले (वय ६८) यांचे त्यांच्या कोल्हापूर जयसिंगपूर येथील मूळगावी आकस्मिक निधन झाले.
यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
प्राचार्य डॉ. सुधीर भोसले २००३ मध्ये लांजा महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवेत रुजू झाले. त्यानंतर ते २०१८ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. सलग १५ वर्षे त्यांनी लांजा महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवा बजावली. ही सेवा बजविताना त्यांनी लांजा महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असे आहे. लांजा महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू होण्यापूर्वी त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयात १८ वर्षे सेवा बजावली होती. लांजा महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. सुधीर भोसले कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या मूळ गावी वास्तव्यास होते. मंगळवारी, दि. २१ जानेवारी रोजी त्यांची तब्बेत अचानक बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.