रत्नागिरी:-संस्कृतमध्ये करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकातले संस्कृत न शिकता संस्कृत साहित्याचा अभ्यास करावा. संस्कृतमध्ये साहित्य भांडार आहे.
कोणत्याही विषयावरचे लेखन संस्कृतमध्ये असून प्रथम संस्कृत वाचायला शिका, बोलायला शिका, दूरदृष्टी ठेवून कौशल्यवान व्हा, असे आवाहन बंगळुरू येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सचिन कठाळे यांनी केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित दोन दिवसांच्या कालिदास स्मृती व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.
व्याख्यानमालेचे हे ६८ वे वर्ष आहे. डॉ. कठाळे यांनी संपूर्ण व्याख्यान संस्कृतमध्ये दिले. डॉ. कठाळे यांनी संस्कृत कुठे शिकवले जाते, संस्कृतशी निगडित अभ्यासविषय आणि अपेक्षा यासंबंधी विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले की, शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालये, गुरुकुल, पारंपरिक पाठशाळा, मठ, आश्रम आणि घरीसुद्धा संस्कृत शिकवले जाते. संशोधन, चित्रपटसृष्टी, अभिलेखागार, व्यवस्थापन, अनुवाद, शब्दकोश निर्मिती, कथालेखन, पौरोहित्य याच्याशी संस्कृतचा जवळचा संबंध आहे. तसेच आयुर्वेद, योग, संगीत, नृत्य, नाट्य, ज्योतिष, शिल्पशास्त्र, अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र, गर्भसंस्कार, उच्चारणशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, ६४ कला, विमानशास्त्र, जाहिरात, विपणन, प्रसिद्धीफलक, स्पर्धा परीक्षक हेसुद्धा संस्कृतवर अवलंबून आहे. संस्कृत जाणल्याशिवाय त्यात अनुवाद करता येणार नाही. संस्कृत भारतीतर्फे संस्कृत प्रशिक्षण दिले जाते. त्यातून भारतात अनेक ठिकाणी संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान, अन्य भाषांचे ज्ञान मिळवले पाहिजे. त्यासाठी संस्कृतचे ज्ञानही आवश्यक असून विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक संस्कृत शिकावे, दूरदृष्टी ठेवून कौशल्यवान व्हावे, असेही डॉ. कठाळे म्हणाले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. कठाळे यांचा सत्कार केला. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी डॉ. कठाळे यांचा परिचय करून दिला. प्रा. प्रज्ञा भट यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानात डॉ. कठाळे यांनी भारतीय ज्ञान परंपरा यावर उद्बोधक माहिती दिली. ते की, भारतीय ज्ञान परंपरा प्राचीन, आधुनिक, शास्त्रीय, व्यावहारिक आहे. अंतरंग, सूक्ष्म, कोणाच्याही विरोधात नाही, सर्वस्पर्शी, कल्पनातीत, सर्वसमावेशकता ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. प्राचीन काळी आयुर्वेद, योग, ज्योतिष, गणित, विज्ञान, कृषि, स्थापत्यशास्त्र, धातुशास्त्र, खगोलशास्त्राचाही सखोल अभ्यास केला होता, त्यामुळे या ज्ञान परंपरेचा अभिमान बाळगा आणि त्यात संशोधनही करा. भारतात ३३ प्रकारची विमाने असल्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आहे. विमानासाठी लागणाऱ्या वजनाने हलक्या परंतु कोणत्याही स्थितीत भंग न होणाऱ्या धातूची निर्मिती त्या काळी केलेली होती. कृषि ग्रंथांचा आधार घेऊन शेती केली, तर ती सर्वांचे कल्याण करणारी ठरेल. लक्ष्मण मंदिरावर आक्रमण झाले. त्यावेळी मंदिराचे नुकसान त्यांना करता आले नाही. ज्यावेळी मूर्ती भंजन केले त्यावेळी सर्व मंदिर क्षणात कोसळले. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा भारतीयांचा अभ्यास होता. ते म्हणाले, संस्कृत भाषेची स्थिती चांगली आहे, त्याबाबत कोणी चिंता करू नका. अनेक ठिकाणी संस्कृतचे स्वागत केले जाते. बंगळुरूमध्ये दरवर्षी संस्कृत शिक्षक पाहिजेत अशा शाळा-महाविद्यालयांच्या जाहिराती येत असतात. युद्धशास्त्र, जलशास्त्र, प्राणिशास्त्र, संमोहनशास्त्र, गंधशास्त्र, रसायनशास्त्र यांच्यावरील ग्रंथही संस्कृतमध्ये आहेत. विविध प्रकारच्या चुंबकांवरील माहिती श्लोकात दिली आहे. द्रावक नावाचा चुंबक आधुनिक वैज्ञानिकांना माहिती नाही. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश आता नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे. अनेकदा आपल्याला परदेशातून ज्ञान मिळाले की त्याचे नवल वाटते. पण संस्कृतमधील भारतीय ज्ञान परंपरेमध्ये शेकडो विषय मांडले गेले आहेत. महाविद्यालय व संस्था नेहमी संस्कृत प्रचार, प्रसारासाठी योगदान देत राहू. प्रा. प्रज्ञा भट यांनी निवेदन केले. विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले. कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांच्यासमवेत प्राध्यापक, विविध अभ्यासक, जिज्ञासू रत्नागिरीकर, शिर्के हायस्कूल व जीजीपीएसमधील विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.