मविआ बैठकीत निर्णय
मुंबई:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले, तर महाविकास आघाडीचं पानिपत झालं. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळेल इतक्याही जागा विरोधी पक्षांना निवडून आणता आल्या नाहीत.
त्यामुळेच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही महाविकास आघाडीला अनेक अडचणी आल्या होत्या. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला, तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता आहे.
आगामी काळातील नियोजन आणि नवीन योजनांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी महाविकास आघाडीची ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत ठाकरे गटाचे अनिल परब, सुनील प्रभू, शरद पवार गटाचे जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान आदी उपस्थित होते. या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या नावावर सविस्तर चर्चा झाली. काही नावे समोर आली आहेत. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद ठाकरे गटाला देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मागील वेळी हे पद काँग्रेसकडे होतं. परंतु, यंदा काँग्रेसपेक्षा ठाकरे गटाचे जास्त आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या पदावर त्यांचा दावा अधिक बळकट असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला देण्याचे या बैठकीत ठरले आहे. याआधी ठाकरे गटाचे नेते आमदार अंबादास दानवे या पदावर होते. आता मात्र हे पद काँग्रेसला जाणार आहे.