रत्नागिरी : नवीन वर्षात सामान्य ग्राहकाला पहिली भेट मिळाली ती महागाईची. धान्य, डाळी, खाद्यतेल, खोबरेल, साबण, टूथपेस्ट आणि बेकरी उत्पादने आदींसह सर्वसामान्यांना दररोज लागणार्या सर्वच वस्तू महागल्या आहेत.
याची खरेदी दर महिन्याला करावीच लागते. त्यामुळे महिन्याचे किराणाचे कमी असलेले बजेट आता 3500 ते 4000 रुपयांपर्यंत पोहोचले. दर परवडत नाही ही ओरड असली, तरी ग्राहकांची त्यातून सुटका होत नाही.
धान्य, डाळी आणि विविध तेल हे रोजचे लागणारे घटक आहेत. ते किलोमागे 10 रुपयांनी महागले आहेत. धान्य महागले, भाज्याही महागल्या आहेत. पालेभाज्या 20 ते 25 रुपये, तर फळभाज्या 60 ते 80 रुपये किलो आहेत. दर आठवड्याला किमान 500 ते 800 रुपयांचा भाजीपाला लागतो. महिन्याला 3500 रुपये भाजीपाल्यासाठी खर्च होतात. कांदे-बटाटे आणि लसूण या तीन घटकांसाठीच 200 रुपये लागतात. हा स्वयंपाकाचा कच्चा मालच भरायला महिन्याला किमान 8 ते 9 हजार रुपये लागतात. मसाला आणि अन्नपदार्थ शिजवण्यासाठीच्या गॅसचा दर तर सततच वाढत आहे. त्यामुळे महागाईचा महास्फोट दर महिन्याला होत आहे आणि याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे.
बेकरी उत्पादनासाठी लागणार्या कच्च्या मालाची दरवाढ झाल्याने बेकरी उत्पादनाच्या किमतीत 20 ते 25 टक्के दरवाढ करण्यात आली असून, नवी दरवाढ ही 10 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे. प्रामुख्याने मैदा, वनस्पती तूप, मार्गारीन, पॅकिंग आदीच्या दरात वाढ झाली आहे.
या परिस्थितीत जुन्या दरामध्ये व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने बेकरी असोसिएशनने 20 ते 25 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना त्याचाही फटका बसतो आहे. मैदा 50 किलोचे पोते सहा महिन्यांपूर्वी दीड हजार रुपये होते, ते आता दोन हजार रुपये झाले आहे. खाद्यतेल पंधरा किलोचा डबा पंधराशेवरून आता 2 हजार 200 ते 2 हजार 300 झाला आहे. यामुळे बेकरी उत्पादनाचा दर वाढवण्यात आला आहे. याबरोबरच बन्स, पिझ्झा बेसला 5 टक्के जीएसटी लागतो.
केक, पेस्ट्रीज, कपकेक, ब्राऊनी, मफिन्सवर 18 टक्के, बिस्किटे कुकीजवर 18 टक्के तर टोस्टवर 5 टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे साहजिकच 20 ते 25 टक्क्यांनी बेकरी उत्पादने महागली आहेत. सारेच महागल्याने जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पैसेच शिल्लक उरत नाहीत. मुलांचे शिक्षण, कपडे खरेदी आणि औषधासाठी लागणारा खर्च निराळाच. त्यामुळे महिन्याला किराणा आणि भाजीपाल्यासाठी किमान दहा हजार रुपये खर्च येतो.
नोकरदाराची पगारवाढ वर्षातून एकदा होते, तर धान्याची, भाजीपाल्याची दरवाढ दर महिन्यालाच होताना दिसते. त्यामुळे खरे कौशल्य गृहिणींचे आहे. हाती येणारी स्थिर रक्कम आणि खर्चाचा मेळ घालण्याचे नियोजन त्यांच्याच हाती आहे.
हॉटेल, रेस्टॉरंटला महागाईचा तडका
सध्या महागाईने सर्वसामान्यांना चांगलेच त्रस्त केले आहे. त्यात तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जात असाल, तर आवडत्या डिशसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. भाज्यांच्या किमती वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंटमधील डिश, मेनूच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या असून खाद्यपदार्थांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचे व्यावसायिक सांगतात.
दररोजच्या जेवणातील भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम हॉटेल, खानावळीतील पदार्थांच्या दरावर झाला आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतावेळी हॉटेल चालकांनी खवय्यांना अनेक ऑफर्स, सवलती दिल्या होत्या. आता त्या सवलतीही बंद होणार असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांत लसूण, कांद्यासह भाज्यांच्या दरात चढ-उतार होत आहे. 65 ते 100 रुपये किलो मिळणारी लसूण 300 ते 400 रुपयांपर्यंत गेली आहे, तर कांद्याचे दरही 10 ते 12 रुपयांवरून 30 ते 35 रुपयांपर्यंत वाढले आहेत. भाज्यांच्या दराची स्थितीही वेगळी नाही. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत चार ते पाच टक्के वाढ करण्याशिवाय पर्यायच नसल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले.