शेतीमध्ये यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञान वापरणे आवश्यक – ऑलीव्हवर मर्चंड
संदीप घाग / सावर्डे
ऑस्ट्रेलियातील आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरण व तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो , तसेच कमीत कमी मनुष्यबळात व अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठ्या शेतीचे व्यवस्थापन नियोजनबद्ध रित्या केले जाते ,असे प्रतिपादन ए .जी. मर्चंड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ,न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया चे सहसंस्थापक ऑलिव्हर मर्चंड यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलियातील आधुनिक शेती व्यवस्थापन व शेतीमधील तंत्रज्ञानाचा वापर या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी मुख्य व्याख्याते ऑस्ट्रेलियातील ए.जी. मर्चंड सर्विसेस चे सहसंस्थापक ऑलिव्हर मर्चंड , सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक ,सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम ,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे ,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर , विद्यालयातील सर्व शिक्षक व 545 विद्यार्थी उपस्थित होते. ऑलिव्हर मर्चंड यांनी ऑस्ट्रेलियातील प्रचंड मोठ्या शेतीमध्ये आधुनिक शेतीव्यवस्थापनाचा व तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कमीत कमी मनुष्यबळात कसा केला जातो हे प्रत्यक्ष चित्रफितीच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अवगत केले . तेथे वापरली जाणारी आधुनिक व अवजड शेती अवजारे , अद्यावत फवारणी यंत्रे ,विविध प्रकारचे तण नियंत्रण ,सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, पिकांचे मूल्यवर्धन, साठवणूक , विक्री , पीक प्रक्रिया उद्योग इत्यादी बद्दल सखोल माहिती दिली.यानंतर सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अशा प्रकारच्या आधुनिक शेती व्यवस्थापनाचे व तंत्रज्ञानाचे भविष्यात वापर करण्याचे आवाहन केले. तसेच ऑस्ट्रेलिया येथे शेती विषयक उच्च शिक्षण घेत असताना आलेल्या अनुभवांचे देखील विद्यार्थ्यांसमोर कथन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेशकुमार यादव यांनी केले.