चिपळूण:- येथील श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे २५ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत कीर्तनमाला
आयोजित करण्यात आली आहे.
गेली आठ वर्षे रसिकांचे भरभरून प्रेम लाभलेली कीर्तनमाला यंदा शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे.
दर दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्रौ ९.३० या कालावधीत आयोजित कीर्तनमालेचे उदघाटन २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक धनंजय चितळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांच्या अमोघ वाणीला सुश्राव्य संगीत साथीदारांची लाभणारी नेटकी साथ रसिकांना स्मरणीय आनंद देत आली आहे. दरवर्षी ओढ लावणारा श्रवणीय कीर्तनाचा जागर, विषयाला साजेसे रंगमंच नेपथ्य, अनुरूप वातावरण निर्मिती व विनामूल्य प्रवेश यामुळे श्री स्वामी चैतन्य परिवाराची ही कीर्तनमाला रसिकांसाठी अविस्मरणीय ठरत आली आहे.
चिपळूणच्या बापट आळी येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांचे निस्सीम उपासक परमपूज्य श्री गुरुमाऊली सद्गुरू वासुदेव दळवीकाका महाराज यांचा आशीर्वाद लाभलेल्या कीर्तनमालेचे यंदाचे नववे वर्ष आहे.
गेल्या दोन वर्षांतील कीर्तनमालेत शिवचरित्र, शौर्य गाथा छत्रपती शंभूराजांची या विषयाला अनुसरून रसिकांनी कीर्तनमालेचा श्रवणीय आनंद घेतला. यावर्षीच्या चार दिवसीय कीर्तनमालेत छत्रपती शंभूराजे यांच्यानंतरच्या स्वराज्याच्या विरोधातील बलाढ्य शत्रूंविरुद्ध लढा कायम ठेवणारे छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, बाजीराव पेशवे यांच्या झुंजार कारकीर्दीचा मागोवा आफळेबुवा घेणार आहेत. त्यांचे व्यासंगी विवेचन व सुश्राव्य संगीताच्या साथीने रसिकांना यावेळी घेता येणार आहे. यामध्ये ऑर्गन साथ रेशीम खेडकर, तबला साथ मिलिंद तायवाडे व पखवाज साथ मनोज भांडवलकर यांची असणार आहे.