शिंदेंची जागा सामंत घेताहेत हे सत्य लवकरच पुढे येईल : माजी खासदार विनायक राउत यांची टिका
रत्नागिरी : डावोसला जाउन उद्योगपतींशी चर्चा करायची सोडून उद्योगमंत्री उदय सामंत यांना गद्दारीची भाषा करावी लागतेय हे दुर्दैव आहे. तेथे जाउन ठाकरे सेना, काँग्रेस पक्ष फोडण्याची भाषा करताना तुमची मर्दूमकी असेल तर ती सामंत यांच्या नामर्दूमकीचे लक्षण आहे. आता गद्दारीचे दिवस संपत आलेत, कारण भाजप नेत्यांनी त्यांना जागा दाखवायला सुरूवात केली असल्याची टिका ठाकरे शिवसेना माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
रत्नागिरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात राउत यांनी बुधवारी दुपारी पत्रकारांशी राजकीय घडामोडींवर संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर खरमरीत टिका केली. डावोसला जाउन महाराष्ट्राच्या, कोकणच्या, रत्नागिरीच्या हितासाठी उद्योग आणण्याच्या बहाण्याने उद्योगमंत्री उदय सामंत गेलेत. असे उद्योगमंत्री हे राज्याला मिळालेत हे दुर्दैव आहे. ज्या विषयासाठी डावोसला गेलेत, त्या विषयावर बोलायचे सोडून ते गद्दारी किती होते, बेइमानीला आपण किती खतपाणी घालतोय अशी दुहेरी स्वप्न पाहताहेत. अशा उद्योगमंत्र्यांच्या बुध्दीची किव करावीसी वाटत असल्याचे विनायक राउत म्हणाले.
रत्नागिरीत 17000 कोटींचा प्रकल्प येणार असे सामंत म्हणताहेत. पण तो प्रोजेक्ट येईल न येईल ते आता सोडून द्या. कारण रत्नागिरी विमानतळ करता करता ते थकून गेलेत असाही टोला राउत यांनी लगावला. केवळ आणि केवळ बतावण्याच्या करण्याच्या, थापा मारण्याच्या यापलिकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय केले हे दाखवून देण्याची आवश्यक असल्याचे राउत यांनी सांगितले.
डावोसला राज्य सरकारच्या खर्चाने दौरे करताय जर त्या पैशाचा विनियोग करायचा असेल तर राज्याच्या हिताच्यादृष्टीने तेथे चर्चा करावी. पण तेथे जाउन पक्ष फोडायची भाषा करू नये. शिंदेंची जागा उदय सामंत घेत असल्याची जोरदार चर्चा होत असल्याच्या विषयावर राउत यांनी गुगली टाकली. उदय सामंत यांची त्यामध्ये मास्टर की असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्याबाबत ठाकरे सेनेचे नेते संजय राउत हे जे बोलले आहेत, त्यात तथ्य आहे. कारण काही दिवसांतच 100 टक्के खरं आहे ते समोर येईल असेही विनायक राउत यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, संजय पुनसकर, प्रसाद सावंत आदी उपस्थिती होती.