जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची माहिती
रत्नागिरी:-जिल्ह्यात बांग्लादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल पोलिसांकडून घेतली जात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शहरातील झोपडपट्टी भागात अवैधरित्या बांग्लादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील झोपडपट्टी भागात संशयितांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल़ तसेच बांग्लादेशी नागरिक आढळून आल्यास त्याला मदत करणाऱ्याना सहआरोपी केले जाईल असा इशारा कुलकर्णी यांनी दिला.
नुकतेच शहरातील साळवी स्टॉप येथे बांग्लादेशी नागरिक असलेली महिला मागील आठ वर्षापासून भारतात वास्तव्य करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच या महिलेने भारतात वास्तव्य करत असताना आधारकार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे तयार केले असून विवाह देखील केल्याचे निष्पन्न झाले. या महिलेच्या नावावर शहरात मालमत्ता खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, त्यामुळे हा सर्व प्रकार करण्यासाठी तिला कुणाची मदत झाली. याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
त्या कामगारांना बांग्लादेशात पाठवणार
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे काही बांग्लादेशी नागरिक चिरेखाणीवर कामाला आले असल्याची बाब समोर आली होती. अनधिकृतरित्या देशात प्रवेश करुन बांग्लादेशी नागरिक बांधकाम क्षेत्र, मच्छीमारी तसेच रोजंदारीचे काम करत आहे त्यामुळे अशा कामगारांवर देखील पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. नाखरेतील चिरेखाणीवरील कामगारांना त्यांच्या देशात परत पाठविण्यासंबंधी संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.