परप्रातीयांना हुसकावून बाहेर काढत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले
खेड : लोटे औद्योगिक वसाहत विस्तारीत टप्प्यातील असगणी येथे कोकाकोला कंपनी उभारणीचे काम सुरू आहे. या कंपनीत स्थानिक तरुणांना प्राधान्य न देता परप्रातीयांना सामावून घेतल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने बुधवारी कंपनीत हंगामा करत काम बंद पाडले. कंपनीतील परप्रातीयांना हुसकावून बाहेर काढत कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत स्थानिकांना सामावून घेण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कंपनीचे काम बंदच राहिल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने लोटे औद्योगिक वसाहतीत कोकाकोला कंपनी उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कंपनीत स्थानिक तरूणांऐवजी परप्रातीयांना सामावून घेतले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर शिवसेना आक्रमक बनली आहे.
माजी जि.प. सदस्य अण्णा कदम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी कोकाकोला कंपनीत बुधवारी धडक देत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. शिंदे शिवसैनिकांनी परप्रातीय कामगारांना बाहेर काढत कंपनीचे काम बंद पाडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करून स्थानिकांना सामावून घेण्याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांच्या आक्रमतेनंतर स्पष्ट केले.
वातावरण तंग झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. कंपनीतील अधिकाऱ्यांच्या स्पष्टोक्तीनंतर आक्रमक शिवसैनिक शांत झाले. याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन धाडवे, अरविंद चव्हाण, युवासेना उपजिल्हाधिकारी सचिन काते, तालुका अधिकारी मिलिंद काते, सुरज रेवणे, राजू आंब्रे, विशाल घोसाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.