सावर्डे- स्वच्छतेचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. निरोगी जीवनाला व पर्यावरण संवर्धनासाठी स्वच्छता अत्यंत उपयुक्त आहे.वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक स्वच्छतेसह पाणवठा स्वच्छता, मंदिर, मशीद स्वच्छता, घर परिसर स्वच्छता या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्यक्ष कृतीद्वारे सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने समाजामध्ये स्वच्छतेचे विषयी जनजागृती निर्माण करण्याचे काम अविरतपणे चालू ठेवले आहे. गांधी तीर्थ जळगाव यांच्या स्वच्छता उपक्रमांतर्गत वर्षभरात विविध स्वच्छतेचे उपक्रम राबविण्यात आले आहेत.
स्वच्छते विषयक जागृती करताना नेहमी वैकुंठभूमी म्हणजेच स्मशानभूमी स्वच्छते पासून वंचित राहिलेली आपल्याला आढळते.मानवी जीवन अमूल्य आहे तरी ते नाशिवंत आहे प्रत्येकाला या ठिकाणी वेळोवेळी जावेच लागते मग हे ठिकाण स्वच्छ असेल तर त्याचा नक्कीच मानवी जीवनावर योग्य परिणाम होतो हे ओळखून विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सावर्डे वैकुंठभूमी स्वच्छ करून परिसरातील नागरिकांच्या समोर एक आदर्श ठेवला असून प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता पाळली पाहिजे याचा संदेश या माध्यमातून दिला आहे. विद्यालयातील संदीप पवार हे शिक्षक गेली 22 महिने प्रत्येक महिन्याच्या तीस तारखेला स्मशानभूमी स्वच्छ करत आहेत.बरोबर आले तर आपले नाहीतर मी एकटा या उक्तीनुसार ते व त्यांची धर्मपत्नी हे काम अविरत करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आहेत.