रत्नागिरी : संस्कृतमध्ये करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकातले संस्कृत न शिकता संस्कृत साहित्याचा अभ्यास करावे. संस्कृतमध्ये साहित्य भांडार आहे. कोणत्याही विषयावरचे लेखन संस्कृतमध्ये असून प्रथम संस्कृत वाचायला शिका, बोलायला शिका, दूरदृष्टी ठेवून कौशल्यवान व्हा, असे आवाहन बेंगलोर येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सचिन कठाळे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित कालिदास स्मृती व्याख्यानमालेत पहिले पुष्प त्यांनी बुधवारी गुंफले. व्याख्यानमालेचे हे ६८ वे वर्ष आहे. डॉ. कठाळे यांनी संपूर्ण व्याख्यान संस्कृतमध्ये दिले. डॉ. कठाळे यांनी संस्कृत कुठे शिकवले जाते, संस्कृतशी निगडित अभ्यासविषय आणि अपेक्षा यासंबंधी विस्तृत विवेचन केले.
ते म्हणाले की, शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालये, गुरुकुल, पारंपरिक पाठशाळा, मठ, आश्रम आणि घरीसुद्धा संस्कृत शिकवले जाते. संशोधन, चित्रपटसृष्टी, अभिलेखागार, व्यवस्थापन, अनुवाद, शब्दकोश निर्मिती, कथालेखन, पौरोहित्य याच्याशी संस्कृतचा जवळचा संबंध आहे. तसेच आयुर्वेद, योग, संगीत, नृत्य, नाट्य, ज्योतिष, शिल्पशास्त्र, अर्थशास्त्र, भूगर्भशास्त्र, गर्भसंस्कार, उच्चारणशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, ६४ कला, विमानशास्त्र, जाहिरात, विपणन, प्रसिद्धीफलक, स्पर्धा परीक्षक हेसुद्धा संस्कृतवर अवलंबून आहे.
संस्कृत जाणल्याशिवाय त्यात अनुवाद करता येणार आहे. संस्कृत भारतीतर्फे संस्कृत प्रशिक्षण दिले जाते. त्यातून भारतात अनेक ठिकाणी संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे. संस्कृत शिकलात तरच त्यात आपण योगदान देऊ शकता. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान, अन्य भाषांचे ज्ञान मिळवले पाहिजे. त्यासाठी संस्कृतचे ज्ञानही आवश्यक असून विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक संस्कृत शिकावे, दूरदृष्टी ठेवून कौशल्यवान व्हावे, असेही डॉ. कठाळे म्हणाले.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. कठाळे यांचा सत्कार केला. संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी वक्ते डॉ. कठाळे यांचा परिचय करून दिला. प्रा. प्रज्ञा भट यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानासाठी विद्यार्थी व रत्नागिरीकर श्रोत्यांची गर्दी झाली. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित केले.
आजचे व्याख्यान
व्याख्यानमालेत आज गुरुवारी २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भारतीय ज्ञान परंपरा यावर डॉ. कठाळे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयातर्फे केले आहे.