संगमेश्वर:-देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व महिला विकास कक्षाअंतर्गत तीन दिवसीय ओरिगामी प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आनंददायी वातावरणात पार पडले. या ३ दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांकरता स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या अशा उपयुक्त प्रशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट केली. महाविद्यालयाला असलेला कलेचा वारसा नमूद करताना अनेक विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रामध्ये केलेली उत्तुंग कामगिरी याप्रसंगी कथन केली.
ओरिगामी प्रशिक्षिका कु. सेजल चंद्रकांत वास्कर ही महाविद्यालयात १२वी कला या वर्गात शिकत असून तिने विद्यार्थ्यांना ओरिगामी या कलाप्रकाराची माहिती देऊन, विविध कलाकृती प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. यामध्ये कागदी गुलाब पुष्प, कमळाची फुले, जरबेरा फुले, अस्टर फुले, ट्यूलिप फुले, गुलाब पुष्पगुच्छ, मिश्र फुलांचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देण्याकरता आकर्षक बॉक्स इत्यादीतून विद्यार्थ्यांनी कार्यानुभवाचा आनंद घेत आकर्षक कलाकृती तयार केल्या. या प्रशिक्षणाचा ५० विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन विविध प्रकारच्या कागदाच्या आकर्षक कलाकृती तयार केल्या. या ओरिगामी प्रशिक्षणामध्ये कु. सेजल वास्कर हिला कु. जानवी वास्कर (१२वी कला) हीने सहाय्य केले.
महाविद्यालयात संपन्न होणाऱ्या विविध कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेली गुलाब पुष्प नियमितपणे देण्यात येत असल्याची माहिती प्रा. सीमा शेट्ये यांनी दिली. या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. सानिका भालेकर, प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले आणि आणि प्रा. देवयानी जोशी यांनी मेहनत घेतली.