ट्रकात 22 गुरे कोंबून भरली होती
चिपळूण :- चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात अलोरे- शिरगाव पोलिसांना यश आले. मंगळवारी रात्री ही कारवाई केली आहे. या ट्रकमधून २२ गुरांची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. ही गुरे लोटे येथील गोशाळेत सुरक्षितस्थळी हलवण्यात आली आहेत. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूणमधून गोवंशची वाहतूक होत असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. तर गेल्या काही वर्षांत गोवंश वाहतुकीप्रकरणी अनेकांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी रात्री खेर्डी येथून गोवंशची वाहतूक होणार असल्याची माहिती भाजप पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्त्यांना समजली. यामुळे या सर्वांनी गोवंशच्या वाहतुकीवर लक्ष ठेवले होते. ज्या ट्रकमधून गुरांची वाहतूक होत होती. त्या ट्रकचा पाठलाग केला. तसेच याबाबतची माहिती अलोरे- शिरगाव पोलिसांना देत या ट्रकवर कारवाई करण्याची मागणी केली.
यानंतर अलोरे – शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी कुंभार्ली घाटमाथ्यावरील पोलिसांना तशा सूचना केल्या. दरम्यान, गुरांची वाहतूक करणारा ट्रक कुंभार्ली घाटात आला असता तेथे असलेल्या पोलिसांनी या ट्रकला थांबवले. तोपर्यंत भाजपचे पदाधिकारी विनोद भुरण व कार्यकर्ते तेथे पोहोचले होते. या सर्वांच्या समोर या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये कोंबलेली गुरे आढळून आली. दोन-चार नव्हे तर तब्बल २२ गुरे (बैल) आढळून आली. यामध्ये तीन गुरे जखमी अवस्थेत असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी ट्रक अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणला. तर गुरांच्या बेकायदा वाहतुकीप्रकरणी दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इक्बाल खेरटकर (रा. खेर्डी) तर ट्रक चालक श्री. नलवडे (रा. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या कारवाईने गुरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कुंभार्ली घाटात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा ट्रक पकडला, दोघांवर गुन्हा
