प्रणील पडवळ / कोळंबे
प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या परेडला उपस्थित राहण्याचे अनेक लोकांचे स्वप्न असते. यावर्षी हा बहुमान साडवली गावामध्ये उद्योगसखी म्हणून काम करणाऱ्या मनीषा अंकुश वगरे यांना मिळाला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावात राहणाऱ्या मनिषा अंकुश वगरे यांची प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या परेड साठी विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली आहे, त्याबद्दल सर्व साडवली गावामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रजासत्ताक दिन २०२५ करिता देशभरातून सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या समुदाय संसाधन व्यक्ती ( कृषिसखी, उद्योगसखी ) व महिला स्वयंसहाय्यता समूह सदस्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत कर्तव्यपथ नवी दिल्ली येथे विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मनिषा वगरे म्हणाल्या सुरुवातीपासूनच आमची घरची परिस्थिती हालाखीची होती, परंतु उमेद च्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली, आणि त्या संधीच सोन करण्याचं मी ठरवलं, आणि आज त्याची पोचपावती मला मिळाली.
आमच्या साडवली गावच नाव दिल्लीपर्यंत पोचलं याचा मला सार्थ अभिमान आहे, आजपर्यंत कधीही दिल्ली पाहिली नव्हती, आपण कधी दिल्लीत जाऊ अस वाटलं नव्हतं, परंतु आज उमेद च्या माध्यमातून काम करताना आज ही संधी मिळाली त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे, हे मी माझे भाग्यच समजते, आज इथपर्यंत पोचण्यासाठी मला माझे पती अंकुश वगरे, आई आक्काताई माने, वडील श्रीमंत माने, आणि भाऊ संजय आणि सुभाष माने तसेच माझे सर्व सहकारी, उमेद च्या सर्व महिला केडर कर्मचारी यांचे सर्वांचे सहकार्य लाभले त्याबद्दल या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते.