गुहागर : पिग्मी संकलन करणाऱ्या तालुक्यातील जानवळे येथील विवाहितेजवळ अश्लिल भाषेत बोलत, धमकी दिल्याप्रकरणी तालुक्यातील वेळणेश्वर येथील उमेश प्रभाकर शिंदे याच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडित महिलेने गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यामध्ये वेळणेश्वर येथील उमेश प्रभाकर शिंदे हा सदर महिलेशी अश्लिल भाषेत संभाषण करून तिला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत असे. त्याचबरोबर सदर महिला शृंगारतळी येथे पिग्मी संकलनास गेल्यावर पाठलाग करत असे. त्याने सदर महिलेचा मोबाईलही हिसकावून घेतला होता. मात्र चुलत दीराने फोन केल्यानंतर त्यांनाही शिवीगाळ करत दोन तासाने मोबाईल परत आणून दिला. त्यानंतर त्याने माझी खूप ओळख आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी देत असे. या प्रकाराला कंटाळून अखेर 18 जानेवारी रोजी सदर महिलेने पतीला हा प्रकार सांगत 19 जानेवारी रोजी याबाबत गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान गुहागर पोलिसांनी शिंदे याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 78, 79, 351(1) व 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस हेडकाँस्टेबल लुकमान तडवी अधिक तपास करत आहेत.