रत्नागिरीतील संरक्षण क्षेत्राचाही समावेश, 2,450 रोजगार निर्मिती
रत्नागिरी:-दावोस येथे महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यात आयएनआर 16,500 कोटींचा महत्वाकांक्षी सामंजस्य करार झाला. संरक्षण क्षेत्रात रत्नागिरी येथे होणाऱ्या या प्रकल्पामुळे 2450 रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इव्ही बॅटरी आणि महाराष्ट्रातील 247 ऊर्जेच्या दृष्टिकोनावर सतेश सेठ (नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा झाली.
अनेक वर्षे पडून असलेल्या स्टरलाईट कंपनीची जागा महाराष्ट्राच्या उद्योग विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर या 500 एकर जागेपैकी 200 एकर जागा भारतीय संरक्षण दलाकडे वर्ग करून तेथे संरक्षण दलाचा शस्त्रास्त्र उत्पादनाचा मोठा कारखाना सुरू होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली होती. सुमारे 30 वर्षे पडून असलेली जागा उद्योग खात्याकडे परत मिळवण्यासाठी मंत्री सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आणि त्याला यश आले.
शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील औद्योगिक वसाहतीमध्ये मागील कार्यकाळात उदय सामंत यांनी उद्योग खात्याने मंत्रिपद स्वीकारल्यानंतर ही जागा परत घेण्याला अधिक गती दिलेली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही जागा उद्योग खात्याकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिल्याने तेथे अन्य प्रकल्प आणण्याचा पर्याय खुला झाला आहे. मंत्री सामंत यांनी या 500 एकरपैकी 200 एकर जागा भारतीय संरक्षण खात्याकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. या जागेत संरक्षण खात्याचा शस्त्रांचा कारखाना उभारला जाईल असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे रोजगाराच्या संधी या प्रकल्पामुळे मिळणार आहे. तसेच जिह्यातील छोट्या मोठ्या उद्योगांना काम मिळण्याची मोठी संधी मिळेल, असे अपेक्षित आहे.
दावोस येथे झालेल्या महाराष्ट्र सरकार आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यात आयएनआर 16,500 कोटींचा महत्वाकांक्षी सामंजस्य करारामुळे संरक्षण क्षेत्रात रत्नागिरी येथे होणाऱ्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.