चिपळूण:-सोमवारी पेठमाप येथील वाशिष्ठी नदी किनारी सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी धाड टाकत 1140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 12 तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नावेद फैसल शेख (23), सलमान अब्दुल रज्जक अलवी (31), शरफुद्दीन इरफान जबले (25), गुलाम मोहम्मद लांडगे (23), मुईन अब्दुल रफिक तांबे (23), मोहम्मदसैफ अमनऊल्ला लांडगे (21), जाईद अफरोज परकार (21), दानिश अस्लम लांडगे (27 सर्व गोवळकोट रोड), नेहाल इम्तीहाज सुर्वे (31), आमीर मुकबूल सुर्वे (29, दोघे-उक्ताड), बाशीद लियाकत कादरी (32), आदिल फिरोज रुमानी (26 दोघे-पेठमाप) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अजित संतोष कदम (चिपळूण पोलीस ठाणे) यांनी दिली आहे.
शहरातील पेठमाप परिसरातील वाशिष्ठी नदीकिनारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी वरील 12 जण 52 पानी पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत होते. याबाबतची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या तरुणांवर धाड टाकत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
दरम्यान दुसऱ्या घटनेत 7 जानेवारी रोजी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर वाशिष्ठी नदी किनारी एका घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल करून 3 हजार 700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हे दोन्ही प्रकार वाशिष्ठी नदी किनारीच घडले आहेत.