रत्नागिरी:-सावकारीने रत्नागिरीत पुन्हा डोके वर काढले आहे. व्याजी पैशाच्या व्यवहारात दिलेली पूर्ण रक्कम स्वीकारूनही सावकाराने जमीन बळकावून 23 लाखाची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये सावकाराला मदत करणाऱ्या वकिलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार संदिप मधुकर वेलोंडे (रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित निलेश किर आणि वकील महेश नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेलोंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,
निलेश किर आणि वेलोंडे यांची चांगली ओळख होती. यातून संदीप याने निलेश किर याच्याकडून पैसे घेतले होते. या व्याजी पैशाच्या व्यवहारात संदीप याने दोन कोरे चेक निलेश याला दिले होते. परंतु संदीप याने रक्कम परतफेड करूनही निलेश याने ते चेक परत केले नाहीत. शिवाय संदीप वेलोंडे यांचे गावातील सुभाष किसन गराटे व निलेश कीर यांच्या व्यवहारात संदीप यांनी मध्यस्थी केली होती. या व्यवहारात ठरल्याप्रमाणे निलेश कीर याला पैसे न मिळाल्याने त्याने सुभाष गराटे यांची ओरी गावातील २५ एकर जमीन निलेश याने आपल्या नावावर करून घेतली. तसेच संदीप याला तू सुभाष गराटेच्या व्यवहारात मध्यस्थी होतास, आता मला जमीन नको, तुझ्यामुळे मला तोटा झाला, आता तूच माझी जमीन घे असा तगादा निलेश कीर याने संदीप याला लावला. तसेच तुझे कोरे चेक वापरून तुझी वाट लावतो अशा प्रकारच्या धमक्या देऊ लागला. ही घटना 15 मार्च 2017 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीत घडली.
तक्रारदार संदीप याने तक्रारीत पुढे म्हटले आहे की व्याजी रक्कमेच्या व्यवहारामधुन निलेश किर याने खरेदी केलेली आमचे ओरी गावातील सर्वे नं. 129 हिस्सा नं. 14/2, 226-1/2, 227-3/2, 229-4/17/2 अशी एकूण सुमारे 25 एकर मी पायरी खरेदी करण्याचे ठरवले. यानुसार जमिनीचे खरेदी खताचे व्यवहाराकरीता मला ऍड महेश नलावडे यांच्या ऑफिसमध्ये बोलावुन घेतले. तेथे जमिनीचे मुळ खरेदी खत करुन त्यावर माझ्या व साक्षीदारांच्या सह्या घेतल्या. यावेळी जमिनीच्या व्यवहारापोठी ठरलेली रक्कम रुपये 22,72,000/-रु ऍड. महेश नलावडे याच्या ऑफिसमध्ये त्यांचा व साक्षीदार श्रीकृष्ण देवरुखकर यांच्या समक्ष निलेश किर याने स्वतःच्या ताब्यात घेतली. ही रक्कम मी घरी ठेवुन खरेदी खत रजिस्टर करण्याकरीता रजिस्टर कार्यालय रत्नागिरी येथे येतो असे सांगुन निलेश कीर तेथून निघून गेला. त्यानंतर विनंती करूनही त्याने खरेदीखत करून जमीन विक्रीचा व्यवहार पूर्ण केला नाही. रजिस्टर न झालेले खरेदीखत ऍड. महेश नलावडे यांनी मला विश्वास देवुन त्यांच्या ताब्यात ठेवले. मुळ खरेदी खत त्यांच्याकडुन घेवुन जावुन माझी निलेश कीर याने रक्कम रुपये 22,72,000/-रु ची फसवणुक केलेली आहे. सदर फसवणुकीमध्ये ऍड. महेश नलावडे यांनी मला व साक्षीदार असणारे श्रीकृष्ण देवरुखकर यांना विश्वास देवुन स्वत:चे ताब्यात ठेवलेले मुळ खरेदी खत आमचे परवानगी शिवाय निलेश किर यांना देवुन माझा विश्वासघात व फसवणुक केली. असे संदीप यांनी म्हटले आहे. संदीप यांची फासावणुक झाल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात निलेश किर व ऍड. महेश नलावडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी निलेश किर आणि ऍडव्होकेट महेश नलावडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 318(4), 308(3), 3(5) आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 कलम 44 आणि 3(a) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.