संगमेश्वर/प्रतिनिधी:- परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चाच एक भाग असलेल्या चिपळूण तालुक्यातील एकमेव पंचकोषाधारीत गुरुकुलामध्ये मातृभूमी परिचय शिबिर सादरीकरण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी ज्ञानप्रबोधिनी निगडी गुरुकुल विभागाचे प्रमुख आदित्य शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावर्षी गुरुकुलातील मुलांची निवासी शिबिरे अनुक्रमे पाचवी- आरण्यक भिले केतकी, सहावी,सातवी आणि आठवी – राजापूर आडिवरे आणि नववी व दहावी- इंदोर उज्जैन निमाड मध्यप्रदेश अशा ठिकाणी अनुक्रमे तालुका, जिल्हा व राज्य परिचय करण्याच्या उद्देशाने नोव्हेंबर महिन्यात जाऊन आली. भीले केतकी शिबिरातून वाशिष्टी नदी, राजापूर शिबिरातून अर्जुना नदी आणि गंगा तर मध्यप्रदेश मधील शिबिरातून नर्मदामैय्याचे पवित्र जल यानिमित्ताने गुरुकुलात आणण्यात आले होते.
या तीनही ठिकाणच्या नद्यांच्या एकत्रित जलपूजनाने आणि मातृभूमी प्रतिमापूजनाने शिबिर सादरीकरण कार्यक्रमाची सुरुवात मंगलमय वातावरणात झाली. मुलांनी या शिबिरामधून घेतलेल्या अनुभवांची उजळणी वृत्तांकन,अनुभवलेखन, मनोगते, तक्ते तयार करणे, काव्य तयार करणे, छायाचित्र संकलन करणे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अशा माध्यमातून करत करत प्रतिनिधी स्वरूपात सादरीकरणाची तयारी केली व गुरुकुलातील इयत्ता पाचवीतील कनक खेडेकर, वंश गडमे,चंद्रभान यादव, आराध्या भुवड, आयुष कानडे, गाथा मोहिते, जुई महाजन,उदय पवार या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षक खेडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर अनुभव मुक्त काव्य स्वरुपात सादर केला तर सहावी ते आठवीच्या मुलांपैकी सहावीतील आदित्य पाटील याचे इंग्रजीतील पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन विशेष कौतुकास पात्र ठरले! सातवीतील अवंतिका जाधव व आठवीतील वैष्णवी भागवत यांनी राजापूर शिबिरात भेटलेल्या व्यक्तीबद्दल आपल्या मनोगतातुन माहिती सांगितली.
इयत्ता नववी दहावीच्या शिबिरातील नववीतील भक्ती लाड आणि सहेजता पवार यांनी छायाचित्रांच्या आधारे मध्यप्रदेश शिबिराचा आढावा घेतला तर नववीतील मैत्रेयी पुरोहितने शिबिरातील परिक्रमा अनुभव आम्हाला विचार करायला प्रवृत्त करणार होता असे आपल्या मनोगतातून सांगितले. नववीतील ओजस कुंटेने भाषा विषयाचा अभ्यास शिबिराला जोडत कल्पना विस्तार करत अहिल्याबाईं होळकरांनी गुरुकुलातील शिबिरार्थी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचन केले. या शिबिरातील छायाचित्रांचे संकलन असलेल्या चित्र पुस्तिकेचे अनावरण प्रमुख पाहुणे श्री आदित्य शिंदे व विभाग प्रमुख श्री.मंगेश मोने सर यांनी या प्रसंगी केले.
आदित्य शिंदे यांनी आपल्या मनोगतातून समर्थ रामदास स्वामी,स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांनी देश पाहण्यासाठी केलेल्या भ्रमंतीचे दाखले देत गुरुकुलाच्या रचनेतील मातृभूमी परिचय शिबिराचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले. शिबिर जाऊन आल्यानंतर शिबिरातील अनुभवांची मनातल्या मनात उजळणी होणारी उजळणी ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक समृद्ध करणारी असते त्यामुळे असे सादरीकरणाचे कार्यक्रम फक्त एका दिवशी करून उपयोगाचे नाही तर मुलांनी – पालकांनी शिबिराचे अनुभव अधिक लोकांपर्यंत पोहोचवायला हवेत असेही आवर्जून सुचवले.
कार्यक्रमातील जलपूजन,अभ्यास तक्ते अशी एकत्रित विशेष आकर्षक मांडणी लक्षवेधी होती. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वप्नाली पाटील मॅडम आणि पर्यवेक्षक संजय बनसोडे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुलातील सौ.दीपा गद्रे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक विभाग प्रमुख मंगेश मोने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुकुलातील सर्वच अध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. गुरुकुलातील अध्यापक मंगेश खेडेकर सर यांनी आभार मानले.