अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांची मागणी
चिपळूण : चिपळूण आगाराच्या नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे काम गेली सात वर्षे सुरू आहे. कोरोनानंतर निधी नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते; मात्र प्रत्यक्षात सात वर्षांत झालेल्या कामापोटी सुमारे पावणेदोन कोटींचा निधी दोन ठेकेदारांना अदा झाला आहे. झालेले काम आणि अदा केलेली रक्कम यात मोठी तफावत आहे. त्यामुळे झालेल्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. तसेच ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांची अनामत रक्कत जप्त करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी केली आहे.
चिपळूण आगाराची इमारत जीर्ण झाल्याने हायटेक बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामापोटी संबंधित कंपनीला ५५ लाख १२ हजार ९१३ रुपये अदा करण्यात आले. नव्याने काम होण्यासाठी ३ कोटी ६९ लाख ३६ हजार ७५ रुपये खर्चाची दुसरी निविदा ६ नोहेंबर २०२० मध्ये काढण्यात आली. त्याचे प्रत्यक्ष कामकाज ९ जुलै २०२२ ला सुरू झाले. दुसरी निविदा पात्र ठरलेल्या ठेकेदार कंपनीला ४६ लाख १४ हजार ७३१ रुपये व ७४ लाख २२ हजार २९१ रुपये असे १ कोटी २० लाख ३७ हजार २२ रुपये अदा करण्यात आले. आगाराची नवीन इमारत पूर्णत्वास जाण्यासाठी संदीप सावंत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या कामी त्यांनी आंदोलनेही केली; मात्र निधीची अडचण असल्याचे आमदार शेखर निकम व संदीप सावंत यांना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. याबाबत माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत म्हणाले, ३ कोटी ८१ लाख ९५ हजार ३७२ रुपये खर्चाची पहिली निविदा काढण्यात आली. यातून झालेल्या कामापोटी पहिल्या ठेकेदारास सुमारे ५५ लाख देण्यात आले. दुसरा ठेकेदार नेमताना ५५ लाख कमी करण्याची आवश्यकता होती; मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे पहिल्या ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून त्याचा काळ्या यादीत समावेश करावा. नवीन ठेकेदारास देखील सुमारे १ कोटी २० लाख अदा झाले आहेत; मात्र त्या तुलनेत फार कमी काम झाले आहे. यापूर्वी निधी नसल्याचे कारण दिले जात होते तर ठेकेदारास पावणेदोन कोटीचा निधी कसा अदा झाला, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.