खेड : तालुक्यातील सवेणी-लिंगायतवाडी येथे सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या वणव्यात बागायती जळून खाक झाली. यात बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. मात्र घराकडे येणारा वणवा येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.
सवेणी-लिंगायतवाडी येथे वणवा लागल्याची खबर मिळताच अग्निशमन दलातील फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, प्रणव घाग, वाहनालक विद्याधर पवार तातडीने घटनास्थळी पोहाचले. वणव्याने रौद्ररूप धारण केल्याने बागायती भस्मसात झाल्या. यात बागायतदारांची हानी झाली असून नुकसानीचा आकडा समजू शकला नाही.
वणवा नजिकच्या घरापर्यंत येत असताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करत आग आटोक्यात आणली. या तत्परतेमुळे घरांना पोहोचणारा धोका टळला. वणवा नेमका कशामुळे लागला याचा उलगडा होवू शकला नाही.