मंडणगड : आंबडवे येथील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाचन पंधरवड्यानिमित्त ‘वाचन संस्कृती- काळाची गरज’ या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वाचक-लेखक संवाद कार्यक्रमही पार पडला.
महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच मुंबई विद्यापीठाच्या सूचनेनुसार आंबडवे येथील उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालयात वाचन पंधरवडा साजरा झाला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात ‘वाचन संस्कृती- काळाची गरज’ या विषयावर आधारित व्याख्यानमाला पार पडली. दापोली येथील प्रथितयश साहित्यिक, पत्रकार व अभ्यासक सुदेश मालवणकर यांनी सध्याच्या व यापुढील काळात ‘सुजाण माणूस’ म्हणून जगायचे असेल तर आपण काय काय वाचले पाहिजे, का वाचले पाहिजे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.याच कार्यक्रमात वाचक-लेखक संवाद कार्यक्रम साजरा झाला. कोकणातील प्रथितयश साहित्यिक बाबू घाडीगावकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी पुस्तकांबरोबरच माणसे, चेहरे, समाज आणि निसर्गाचे ‘वाचन’ करावयास हवे. विद्यार्थ्यांना आपल्या गावाबद्दल, परिसराबद्दल, परिसरातील निसर्ग, परिसंस्था, पर्यावरण आदींबाबत माहिती निश्चित असावयास हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह बी.एम.एस. विभाग प्रमुख प्रा. अमोल राजेशिर्के, ग्रंथपाल डॉ. दिगंबर हेमके, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनस्वी गंबर यांनी केले, तर कोमल पवार यांनी आभार मानले.