राजापूर:-सागवे येथील श्री कात्रादेवीचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवारी, दि. २१ जानेवारी रोजी साजरा होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीकरिता राजापूर एस.टी.आगारातून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आणि विजयदुर्ग आगारातूनही गाड्या सोडण्यात येणार आहेत.
राजापूर तालुक्यातील सर्वांत मोठी यात्र अशी सागवे येथील श्री कात्रादेवीच्या यात्रेची ख्याती आहे. या यात्रा काळामध्ये कोकणातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मंगळवारी ही यात्रा होत असून ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांच्या सेवासुविधांबरोबरच यात्रेत येणाऱ्या व्यावसायिकांना दुकानगाळे व योग्य जागा उपलब्ध करून देणे, जागेची सफाई करणे, रस्त्यांची सफाई व डागडुजी आणि सुशोभीकरण करणे, यात्रास्थळी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था व वाहतूक व्यवस्था करणे यांसारखी कामे करण्यात येत आहेत. भाविकांना यात्रास्थळी जा-ये करण्यासाठी राजापूर एसटी आगाराकडून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कात्रादेवी वाडी ते यात्रा ठिकाण-दोन गाड्या शटल फेऱ्या, कात्रादेवी ते कुंभवडे-हरचेरी-तारळ-दोन शटल फेऱ्या, कात्रादेवी ते कुंभवडे-नाणार-दोन गाड्या शटल फेऱ्या, राजापूर ते कात्रादेवी यात्रा डोंगरमार्गे-चार गाड्या शटल फेऱ्या, रत्नागिरी-जैतापूर डोंगरतिठा मार्गे यात्रा, राजापूर ते कात्रादेवी यात्रा हातिवले मार्गे दोन गाड्या शटल फेऱ्या अशा प्रकारे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
शिरसे-धाऊलवल्ली या रात्रवस्तीच्या गाड्या ४५ प्रवाशांच्या उपलब्धततेनुसार त्या त्या ठिकाणावरून यात्रा ठिकाणी जादा फेऱ्या करणार आहेत. यात्रेसाठी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी महिला सन्मान योजनेअंतर्गत निम्मे तिकीट, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिक निम्मे तिकीट या सवलती लागू राहणार आहेत. कात्रादेवी मार्गनिवारा आणि यात्रेच्या ठिकाणी स्वतंत्र नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार आहे. या सुविधेचा यात्रेकरूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.