रत्नागिरी : गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या एस.टी. स्टॅण्डचे काम आता वेगाने सुरु झाले असून अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात या बसस्थानकाचे लोकार्पण करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे.
स्वत: नूतन पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी याची पाहणी करुन कामाचा आढावा घेत ठेकेदार व अधिकार्यांनाही सूचना केल्या होत्या. त्यामुळे रत्नागिरीकरांचे नव्या बसस्थानकाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
रत्नागिरीकरांना चांगले बसस्थानक असावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रयत्न केले होते. जुने बसस्थानक पाडून नव्याचे कामही सुरु झाले. मात्र आलेल्या अनेक विघ्नांमुळे हे काम काही वर्षे रखडले. त्यातही निधी वेळेवर उपलब्ध न झाल्याचा फटकाही या कामाला बसला.
या सर्वातून मागील सरकारमध्येही उद्योग विभागाची जबाबदारी सांभाळणार्या ना. उदय सामंत यांनी मार्ग काढला. रत्नागिरी प्रमाणेच जिल्ह्यात अन्य स्थानके आणि राज्यातील काही बसस्थानकांसाठी एमआयडीसीकडून निधी उपलब्ध करुन दिला. रत्नागिरीतील ठेकेदार बदलून, रत्नागिरीमधील उत्कृष्ट काम करणार्या निर्माण या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे या कामाची धुरा दिली. या ठेकेदारांनीही तात्काळ अर्धवट राहिलेली कामे निवडणुकीपूर्वी पूर्ण करीत, एसटी बसस्थानकाची उभारणी केली. आता काम अंतिम टप्प्याकडे आले आहे. लांबपल्ल्याच्या बसेससोबतच शहर वाहतुकीसाठी बसस्थानक एकाच ठिकाणी होणार आहे. त्यादृष्टीने रचना करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्षाचे काम सुरु झाले. प्रवाशांसाठी बैठक व्यवस्थेसह, बसेसचे प्लॅटफॉर्म, बसस्थानकात प्रवेशद्वाराचे काम सुरु आहे. बसेस उभ्या करण्यासाठी काँक्रिटीकरण सुरु आहे. शेकडो मजूरांचे हात दिवस रात्र झटत आहेत.
रत्नागिरीचे बसस्थानक आगळेवेगळे असावे यासाठी ना. उदय सामंत यांची धडपड सुरु आहे. प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधा याठिकाणी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. दोन ते तीन महिन्यांत हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे.
एमआयडीसीकडून निधी उपलब्ध…
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीकडून बसस्थानकांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील चिपळूण, लांजा, संगमेश्वर येथील बसस्थानकांची कामेही सुरु आहेत. रत्नागिरी बसस्थानकासह, माळानाका येथील विभागीय कार्यालय, मुख्य कार्यशाळा, टीआरपीसह माळनाका येथील कर्मचारी वसाहत, विश्रामगृह यांचीही दुरुस्ती करण्यात आली आहे.