गणपतीपुळे : चोरी गुन्ह्याच्या प्रकरणातील फरार आरोपीला गणपतीपुळे येथील पोलिसांनी गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान गणपतीपुळे येथे जेरबंद केले. नितीन बोडके असे त्याचे नाव असून, रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकातील गुन्ह्याप्रकरणी त्याचा शोध सुरू होता.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात नोंद असलेल्या एका चोरीच्या प्रकरणात नितीन बोडके याचा शोध सुरू होता. गुरुवारी, १६ जानेवारी रोजी त्याचे गणपतीपुळे या ठिकाणी लोकेशन दिसले. त्यानंतर ग्रामीण पोलिस स्थानकाच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी गणपतीपुळे पोलिस चौकीचे हवालदार नितीन भागवत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने नितीन बोडके याचा शोध सुरू केला. पोलिस हवालदार नीलेश भागवत यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक महेश फडकले आणि ओमकार चव्हाण यांच्या सहकार्याने संबंधित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. एका रिक्षाचालकाने पोलिसांना नितीन बोडके गणपतीपुळे येथे दिसल्याची माहिती दिली.
त्यानंतर अथक प्रयत्नांनी त्याला जेरबंद करून पोलिस हवालदार नीलेश भागवत यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार विनायक राजवैद्य व अन्य पोलिस सहकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे. गणपतीपुळे पोलिसांनी केलेल्या कामगिरीबाबत जयगड पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कौतुक केले. त्याच्या अटकेमुळे अन्य चोऱ्यांवरही प्रकाश पडण्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.