मध्यरात्री रास्ता रोको अन् जाळपोळ
रायगड:-जिल्हा पालकमंत्री पदावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी युक्त संताप दिसत आहे. या संदर्भात रात्री उशिरा कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेधानंतर भरत गोगावले यांनी आपल्या पहिल्या नियुक्तीचा निर्णय आपल्याला अनपेक्षित असल्याचे स्पष्ट केले.
आज सकाळी दहा वाजता महाड तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या संघटनांची तातडीची बैठक ढालकाठी शिवनेरी येथे आयोजित केली असून या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा पालकमंत्री पदाची अखेर शासनाकडून काल घोषणा करण्यात आली. रायगडच्या पालकमंत्री पदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा जबाबदारी देण्यात आल्याच्या घोषणेनंतर महाड मधील शिवसैनिक रात्री उशिरा आक्रमक झाले. संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. रस्त्याच्या मध्यभागी टायर जाळून आदिती तटकरे व खा. सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, या संदर्भात पत्रकारांशी बोलताना रात्री उशिरा भरत गोगावले यांनी हा निर्णय आपल्याला अनपेक्षित व धक्कादायक होता, असे सांगून आपली नाराजी व्यक्त केली. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन व भाजपचे तीन आमदार असून जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पालकमंत्री पदासंदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली होती. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यासंदर्भात जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. नियुक्ती संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला नसून त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाड तालुकाप्रमुख बंधू तरडे यांनी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीची आज सकाळी दहा वाजता शिवनेरी ढालकाटी येथे गोगावले यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक बोलवली असल्याची माहिती दिली. यामध्ये गोगावले यांच्या पालकमंत्री पदा संदर्भात शिवसैनिकांची भूमिका निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट केले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या रायगड पालकमंत्री पदाच्या नियुक्ती वरून जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळेच सकाळी दहा वाजता होणाऱ्या बैठकीकडे रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.