चिपळूण : गाणे-खडपोली एमआयडीसीत एका सॉ मिलसमोरील भागात असलेले भंगार गोदाम शनिवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत भस्मसात झाले. आग लोकवस्तीपर्यंत पोहोचत असताना दाखल झालेल्या नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबामुळे पुढील अनर्थ टळला.
शनिवारी दुपारी एमआयडीसीला लागूनच असलेल्या खासगी जागेत कश्यप यांच्या मालकीच्या प्लॅस्टिकच्या मालाचे भंगार गोदामाला आग लागली. कमी प्रमाणात असलेली आग नंतर भडकली. तत्काळ नगरपरिषदेकडे संपर्क साधण्यात आल्यानंतर अग्निशमन बंब दाखल झाला. या गोदामाला लागूनच लोकवस्ती असल्याने आग तिथपर्यंत जाण्याचा धोका होता. मात्र बंबासह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. नगर परिषदेचे फायरमन देवदास गावडे, महेंद्र लोकरे, प्रतिक घेवडेकर, वाहनालक मनोज फरांदे यांनी आग विझविण्यास महत्वपूर्ण कामगिरी बजावली. आगीनंतर पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणा दाखल झाली होती. मात्र आगीचे कारण आणि नुकसान याबाबती माहिती उपलब्ध झाली नाही.