रत्नागिरी : चार दिवसांपूर्वीच रत्नागिरीत खळबळ उडवून देणारी घटना घडलेली असताना आता त्याच शाळेतील आणखी एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार पुढे आला आहे. पीडित विद्यार्थिनीने पालकांसह रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात त्या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित शिक्षकावर ॲट्रॉसिटी आणि पॉकसो अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस आर भारदे असे गुन्हा दखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
रत्नागिरी शहरातील एका माध्यमिक शाळेत शिक्षकांने विद्यार्थींनींशी गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार आठवडाभरापूर्वी समोर आला होता. पोलिसांनी त्या शिक्षकाला ताब्यात घेत गुन्हाही दाखल केलेला आहे. हे प्रकरण ताजे असताना आणखी एका शिक्षकाने विद्यार्थींनीशी गैरवर्तन केल्याचे प्रकरण समोर आले असून याप्रकरणीही शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबधित विद्यार्थिनीच्या पालकांनी त्या शाळेत जाउन या प्रकाराचा जाब विचारत शिक्षकाची धुलाई केली होती. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला होता. त्या शिक्षकाला शाळा व्यवस्थापन समितीने गंभीर दखल घेत तात्काळ निलंबितही केले होते.
मात्र त्यानंतरही आणखीन एक शिक्षक अशा प्रकारात गुंतला असल्याची समोर आले. त्यामुळे पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थींनीने तिच्याबाबतीत घडल्या प्रकाराची कैफियत आपल्या पालकांशी कथन करत पोलिसांत धाव घेतली आहे. त्यानंतर पालकांनी संशयित भारदे या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ॲट्रॉसिटी तसेच पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.