▪️ शोध कलारत्नांचा कार्यशाळेचे उद्घाटन
▪️ चार दिवसांची निवासी कार्यशाळा
▪️ कलाध्यापकांचे मार्गदर्शन लाभणार
संगमेश्वर / प्रतिनिधी :- रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार हे एक कलासक्त व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याच संकल्पनेतून गतवर्षीपासून “ शोध कलारत्नांचा ” हा कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच उपक्रम सुरू करण्यात आला. एकाच वेळी लाखो लोकांजवळ बोलण्याचे सामर्थ्य हे केवळ कलेमध्ये आहे. कार्यशाळेतून सकारात्मक ऊर्जा मिळते. जगण्याचे सामर्थ्य वाढवण्याचे काम कला करत असते. आपल्या दडलेल्या कलेचा ज्याला शोध लावता येतो, तो माणूस सुदैवी हा शोध लागण्यासाठीच “ शोध कलारत्नांचा ” या कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी दिली. जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून गतवर्षीपासून शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या शोध कलारत्नांचा या निवासी कार्यशाळेचे आयोजन सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री कला महाविद्यालय, सावर्डे येथे १८ जानेवारी ते २५ जानेवारीअखेर दोन टप्प्यात करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात शिक्षणाधिकारी कासार हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक शिवाजी यादव, कॉमन पूलचे संदेश कडव, चिपळूणचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, विस्तार अधिकारी देसाई, सह्याद्री कला महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राध्यापक प्रदीप कुमार देडगे, अमित सुर्वे, रुपेश सुर्वे , अवधूत खातू, विक्रांत बोथरे, ओरिगामीचे मार्गदर्शक उध्दव तोडकर, बाहुली नाट्याचे मार्गदर्शक तुकाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षण अधिकारी कासार पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातून एकूण १४४ विद्यार्थ्यांची गतवर्षी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. सह्याद्री कला महाविद्यालयाच्या परिसराला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्वतः भेट दिली. त्यांना हा परिसर कमालीचा आवडला. याच परिसरात शोध कलारत्नांमधील विद्यार्थ्यांची कार्यशाळा व्हावी अशी त्यांची मनापासून इच्छा होती. येथील परिसराची कार्यशाळेतील विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, कलेच्या वातावरणात विद्यार्थी रममाण व्हावेत आणि यातून त्यांना एक सकारात्मक ऊर्जा मिळावी, असा या कार्यशाळेचा मुख्य हेतू आहे. विविध परीक्षांमुळे आज विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असली, तरी ती उद्या ती वाढेल असा विश्वास कासार यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात कॉमन पूलचे संदेश कडव म्हणाले की, गतवर्षी तालुका आणि जिल्हास्तरावरील कार्यशाळा संपन्न झाल्या. भविष्यात कलाक्षेत्रात करिअर घडवण्यासाठी या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव आपल्या मनोगतात म्हणाले की, चित्रनिर्मितीसाठी वयाचे बंधन नसते, कलेचे अद्यावत ज्ञान विद्यार्थ्यांना नेहमीच मिळाले पाहिजे. बालकांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना कलाविष्कार सादर करण्याची संधी देत, त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढविण्याचे काम या कार्यशाळेतून नक्की केले जाईल असा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. १८ ते २१ आणि २२ ते २५ जानेवारी या दोन टप्प्यातील निवासी कार्यशाळेचे वेळापत्रक त्यांनी यावेळी जाहीर केले. ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेश शिर्के यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक करून मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांना धन्यवाद दिले. कलेमुळे माणूस अधिक संवेदनशील होतो. कलेला वयाचे बंधन नसते. विद्यार्थी आपल्या आयुष्यात नक्की काय करू शकतात, याचा शोध या कार्यशाळेतून घेतला जाणार आहे. कला ही एकच अशी भाषा आहे, की जगातल्या सर्व भाषांना ती जोडू शकते. असा विश्वास व्यक्त करून राजेशिर्के यांनी या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल झालेला पालकांना पाहायला मिळेल याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी देसाई यांनी केले.