नमन मंडळ, कलावंताना अनुदानाचा मार्ग मोकळा
चिपळूण:-कोकणात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नमन या कलेचा यापूर्वी लोककला या प्रकारात समावेश करण्यात आल्यानंतर आता भरवण्यात येणाऱ्या नमन महोत्सवालाही शासनाकडून 35 लाख 47 हजार रुपयांचे अनुदानही जाहीर केले आहे. या बाबतचा प्रशासकीय मंजुरीचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे याप्रश्नी पाठपुरावा करत असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांच्या लढयाला मोठे यश प्राप्त झाले आहे. त्याबरोबर यानिमित्त कोकणातील नमन मंडळे व कलावंत यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
कोकणात नमन या कलेला फार मोठे महत्व आहे. कोकणात अनेक नमन मंडळे असून त्या माध्यमातून अनेक कलाकारही कोकणात तयार होत आहेत. विशेष म्हणजे कोकणात ही कला कायम असून त्याची लोकप्रियताही कायम आहे. परंतु या नमन मंडळांना तसेच कलावंतांना राजाश्रय नसल्याने आर्थिक अडचणीबरोबरच समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी कोकणातील ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. अशातच सावंत यांनी याची दखल घेत कोकणातील सर्वात पहिला नमन महोत्सव सावर्डे येथे आयोजित केला होता. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी या कलेला राजाश्रय मिळावा, यासाठी सावंत यांनी प्रयत्न सुरू केले. अगदी मंत्रालयापर्यंत त्यांनी सलग पाठपुरावा केला होता.
दरम्यान, तत्कालीन सांस्कृतिक मंत्री तसेच उद्योगमंत्र्यांनी सावंत यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला व कोकणातील या कलेचा शासनाच्या ‘लोककला’ या प्रकारात समावेश करण्याचा निर्णय 9 जून 2014 रोजी घेण्यात आला. त्यानुसार शासनाच्या लोककलावंत पॅकेज अनुदान या योजनेत नमन लोककलेचा समावेश करून योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरल्यास समितीच्या शिफारशीनुसार प्रत्येक मंडळाला 2 लाख ते अडीच लाख, तसेच प्रत्येक प्रयोगाला 15 हजार याप्रमाणे अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले होते. तसेच एका कला पथकास 20 प्रयोगासाठी आणि एका आर्थिक वर्षात 10 नमन मंडळाना हे अनुदान देण्याचा निर्णयही शासनाने घेतला होता. परंतु हा निर्णय लालफितीत अडकून राहिला होता.
अखेर सावंत यांनी पुन्हा एकदा या संदर्भात पाठपुराव्याला सुरुवात केली होती. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून मंत्रालयात वरिष्ठ पातळीपर्यंत धाव घेतली आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. महाराष्ट्र शासनाने महत्वपूर्ण अध्यादेश काढत कोकणातील नमन महोत्सवाला 35 लाख 47 हजार इतके अनुदान मंजूर करण्यात आले असून प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. यामुळे नमन मंडळांना व कलावंतांना प्रयोगासाठी अनुदान मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.