मुंबई-गोवा महामार्गाचे कामात मोठा भ्रष्टाचार : दलवाईंचे पत्रकार परिषदेत आरोप
सामंत बंधूवर जोरदार टीका
चिपळूण : या सरकारकडून कोकणी माणसावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे येथील मुंबई-गोवा महामार्ग, वाशिष्ठीतील गाळ उपसा, विकासाला खीळ घालणारी निळी व लाल पूररेषा, मध्यवर्ती बसस्थानक असे अनेक प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. ते कसे करणार, हे 20 दिवसात सरकार व संबंधित यंत्रणेने जाहीर करावे, अन्यथा काँग्रेस रास्तारोको आंदोलन करेल, असा इशारा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी शुक्रवारी चुळुंबायथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, गेली 12 वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. जे काही काम झाले आहे, तेही निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे मी नितीन गडकरी यांना भेटून आपण दोघांनी चिपळूण ते मुंबई असा कारने प्रवास करूया, कामाचा दर्जा बघूया, अशी विनंती करणार आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गरज नसताना खेड व अन्य भागात पूल बांधले आहेत. बहादूरशेखनाका येथील पुलाचा दर्जा यापूर्वी दिसून आला आहे. त्यामुळे पुलाचे काम कधी होणार, असा सवालही दलवाई यांनी उपस्थित केला.
गुहागर-विजापूर मार्गाचे रूंदीकरणही रखडले आहे. त्यामुळे आवश्यक ते भूसंपादन व अन्य कार्यालयीन प्रक्रिया संबंधित विभागांनी तातडीने करावी व लवकरच हा मार्ग पूर्ण करावा. चिपळूणच्या पुराचे मुख्य कारण असलेला गाळ उपसा गतीमान होण्याची गरज आहे. गोवळकोट ते करंबवणे व अन्य भागातील गाळही काढला गेला पाहिजे. तसे न केल्यास पुराचा प्रश्न कायम राहणार आहे. मुंबईतही पूर येतो. मात्र तेथे लाल व निळी पूररेषा नाही. त्यामुळे ती चिपळुणातच का? असा आमचा सवाल असून या पूररेषा तातडीने हटवाव्यात. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम गेली 6 वर्षे रखडले आहे. ते पूर्ण कधी होणार, असा सवालही त्यांनी केला.
सामंत बंधूंवर टीका
मंत्री उदय सामंत बोलतात जास्त, मात्र काम कमी करतात. त्यांच्या जोडीला आता बंधूही आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांनी विकासाला महत्व द्यावे, असे सांगताना येथे आरोग्य, शिक्षणाच्या चांगल्या सोयी नाहीत. अनुदानित शाळांना अनुदान दिले जात नाही. नव्या शाळांना कायम विनाअनुदानित म्हणून परवानगी दिली जाते. यामुळे गरिबांच्या मुलांनी शिक्षणापासून वंचित राहण्यासाठी हे केले जात आहे. याला पूर्वीचे काँग्रेसचे सरकारही जबाबदार असल्याचे सांगत पक्षाला घरचा आहेर दिला. यावेळी पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष लियाकत शहा, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे आदी उपस्थित होते.