सिंधुदुर्ग:-प्रतिकूल हवामान आणि झाडांवर बुरशी आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळकोकणातील स्थानिक बाजारपेठेत नारळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एका मोठ्या नारळाची किंमत ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
कोकणात स्वयंपाकासाठी तसेच देव आणि धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर नारळाचा वापर होतो. शिवाय कोकणात किनारपट्टी भागातली जमीन आणि खारी हवा नारळ लागवडीसाठी पोषक आहे. त्यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नारळाची लागवड आहे. मात्र सध्या प्रतिकूल वातावरण आणि विविध बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या सहा महिन्यात नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे.
सध्या सुरू असलेले विविध धार्मिक सण, गावोगावच्या जत्रा यामुळे बाजारपेठेत नारळाला मोठी मागणी आहे. पण बाजारपेठेत नारळाची अवाक मंदावली आहे. त्यामुळे नारळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. सध्या लहानात लहान नारळ ३० ते ३५ रुपये, मध्यम नारळ ४० ते ४५ रुपये तर मोठा नारळ ५० ते ६० रुपये दराने विक्री केला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी याच नारळाची किंमत सरासरी १८ ते २५ रुपये एवढी होती. म्हणजे नारळाच्या दरात आज दुपटीने वाढ झाली आहे. कोकणात स्वयंपाकासाठी सर्रास नारळाचा वापर होतो. नारळा शिवाय जेवण आणि कल्पनाच कोकणी माणूस सहन करू शकत नाही. मात्र, नारळाचे दर अव्वाच्या सव्वा वाढल्याने गृहिणींचे मासिक बजेट चांगलेच कोलमोडले आहे. तर, नारळाला पर्याय नसल्याने नागरिकांच्या खिशाला मात्र चाट बसत आहे. शिवाय देवधर्म आणि धार्मिक कार्यासाठी नारळ लागतोच. अलीकडे तर सत्कार समारंभ आणि अन्य उपक्रमांमध्ये देखील नारळाचे महत्त्व वाढले आहे. परिणामी नारळाची मागणी अधिक आणि उत्पादन कमी अशी परिस्थिती झाली आहे
हवामानात सातत्यान होणारे बदल, अवकाळी पाऊस अशा निसर्गाच्या लहरी परिस्थितीमुळे नारळाच्या झाडांवर बुरशीजन्य तसच कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोळी रोग, शिवाय खोड कीड आणि भुंगा अशा किड रोगांचा प्रादुर्भाव नारळ झाडांवर झाल्याच दिसून येत. या रोगामुळे मोठ्या प्रमाणात होणारी फळ गळती, फळांचा आकार लहान होणे, फळ कुजून जाणं नारळाला फुलोरा न येणे असे परिणाम दिसून येतात सहाजिकच स्थानिक नारळाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे त्यामुळे नारळाचे दर मात्र गगनाला भिडले आहेत.
कोकणातल्या बाजारपेठांमध्ये स्थानिक नारळांबरोबरच कर्नाटक आणि केरळ या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात नारळ आयात केला जातो. मात्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या किनाऱ्याकडच्या राज्यात सुद्धा नारळ उत्पादनाची अशीच परिस्थिती असल्याचे नारळ व्यावसायिकांनी सांगितले. एकंदरीतच देशभरातच नारळ उत्पादन कमी झाले आहे, त्याचा सुद्धा परिणाम नारळाच्या किमती वाढीत झाला आहे.