मुंबई – ‘लाडकी बहीण योजने’च्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला स्वत:हून पुढे येत असून आतापर्यंत अनेक लाभार्थींनी स्वत:हून या योजनेचे पैसे परत करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मात्र दिलेले पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसला तरी यापुढच्या काळात निकषात बसणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘लाडकी बहीण योजने’चा लाभ अपात्र असणाऱ्या महिलांनीही मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशा बनावट लाभार्थींच्या बँक खात्यातून सरकारकडून जमा झालेले पैसे परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याविषयी स्पष्टीकरण देताना तटकरे यांनी कोणालाही दिलेले पैसे सरकार परत घेणार नाही.
पण जे निकषात न बसणारे लाभार्थी आहेत त्यांनी स्वत:हून मिळालेले पैसे परत करावेत, असे आमचे आवाहन आहे. विभागाने पैसे परत करण्यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक टाकलेली आहे. अनेक महिला स्वत:हून पैसे परत करत आहेत. दिवसाला अनेक महिलांनी मागील काही दिवसांत पैसे परत केले आहेत.
निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला यापुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील. मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीने परत घेण्याचा अद्याप तरी विचार नाही. यापुढे मात्र निकषात न बसणाऱ्या लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जाऊ नये, याकडे आमच्या विभागाचे बारीक लक्ष असणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
नवीन निकष नाहीत
तटकरे म्हणाल्या, ‘जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा हप्ता दिला जाईल, त्यावेळी लाभार्थींची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झालेली असेल. या योजनेसाठी नव्याने कोणतेही निकष तयार केले जाणार नसल्याचेही नाहीत. नवीन कोणत्याही निकषांची गरजच नाही.
दोन सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही किंवा चारचाकी वाहन असणाऱ्यांना, अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या या योजनेचा लाभ घेता येत नाही हे निकष योजना जाहीर झाली तेव्हाच स्पष्ट केले होते. त्या निकषांची पडताळणी यापुढील काळात काटेकोर केली जाणार आहे.’