उदय दणदणे / मंडणगड:-पालवणी येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन 8 जानेवारी रोजी सासूचे दोन तोळयाचे मंगळसूत्र घेऊन पसार झालेल्या रायगडमधील जावयाला मंडणगड पोलिसांनी आठ दिवसांतच गावारी म्हाप्रळ येथे ‘फिल्डींग’ लावून नाटयमय घडामोडीनंतर पकडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात जावई समीर शंकर गोसावी याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या मोबाईल लोकेशनवरून शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा सापडून येत नव्हता. मंडणगड पोलीस पथकाने माणगाव, दासगाव, महाड येथे जाऊन आरोपीचा पाच दिवस शोध घेऊनही तो सापडून आला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबावर बारीक लक्ष ठेवले होते. गावारी येथे सकाळी 10 वाजता आरोपी हा त्याच्या पत्नीस भेटण्यासाठी म्हाप्रळ येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांचे पथक साध्या वेषात म्हाप्रळ येथे रवाना होऊन एका ठिकाणी दबा धरून बसले. दुपारी ठिकाणी 1.10 वाजता आरोपी त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी म्हाप्रळ येथे येताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. यानंतर मंडणगड पोलीस ठाण्यात पोलिसी खाक्या दाखवता गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.