ग्रामीण पोलिसांची कारवाई; दोघे उत्तरप्रदेशचे
रत्नागिरी : तालुक्यातील खेडशी-गयाळवाडी येथे मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या दुकानाचा मागील पत्रा उचकटून चोरट्यांनी ३४ हजारांचा मुद्देमाल पळवला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनंतर २४ तासांत उत्तरप्रदेशच्या दोन चोरट्यांना जेरबंद केले. मडगाव-गोवा रेल्वेस्टेशन येथून रेल्वे पोलिसदलाच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
शादाब मोहम्मद रेहमुद्दीन मुस्तकीम (वय २७, रा. गझियाबाद, उत्तरप्रदेश), झुबेर लियाकत अली (२२, रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना १४ ते १५ जानेवारी या कालावधीत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुदेश तुकाराम गुरव (वय ३०, रा. टेंभ्ये, भैरीमंदिराच्या जवळ, रत्नागिरी)
यांचे खेडशी-गयाळवाडी येथे मोबाईल दुरुस्तीचे छोटे दुकान आहे. या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा लोखंडी सळीने उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि मोबाईल हॅण्डसेट, लॅपटॉप आणि मोबाईल साहित्य असा ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. या प्रकरणी सुदेश गुरव यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीनंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र यादव, पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव, उपनिरीक्षक अभय तेली, विनोद भितळे, विनायक राजवैद्य, राजेंद्र वळवी यांच्या पथकाने हा गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आणला. चोरी करून पळून गेल्यानंतर माहितीच्या आधारे पोलिसांनी मडगाव रेल्वेस्टेशन येथून रेल्वे पोलिसदलाच्या मदतीने या संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.