राजापूर : तालुक्यातील कुवेशी येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा नं. १ मध्ये तब्बल ८० पटसंख्या असलेल्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेमध्ये चार शिक्षकपदे मंजूर आहेत. सातत्याने शिक्षक गैरहजर, काहींची बदली आदी कारणांमुळे शिक्षकच उपलब्ध नसल्याने ८० पटसंख्या असलेल्या सात वर्गांना एका शिक्षकाला अध्यापन करावे लागत आहे. त्यातून, मुलांच्या शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाल्याने आक्रमक झालेल्या कुवेशी येथील पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी सरपंच मोनिका कांबळे यांच्यासमवेत पंचायत समितीला धडक दिली.
सातत्याने गैरहजर राहणारा शिक्षक आणि त्याच्या केवळ कारवाईचे आश्वासित करणारे त्यांचे वरिष्ठ यांच्यावर तत्काळ कारवाई करताना त्यांची शाळेवरून बदली करावी, अशी मागणी कुवेशी येथील पालकांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदनही पालक, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आले. शिक्षकांची अनुपस्थिती आणि मुलांची होणारी शैक्षणिक गैरसोय याकडे जगताप यांचे लक्ष वेधताना त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
गेल्या दोन वर्षांमध्ये कमी शिक्षक संख्येमुळे मुलांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीमुळे शिक्षण विभागाला पालकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे. त्यातून जिल्हा परिषदेने कंत्राटी शिक्षक भरती करत अपुरा शिक्षक संख्येचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला आहे मात्र कुवेशी येथील केंद्र शाळा नंबर एक मध्ये चार शिक्षक मंजूर असूनही शिक्षकांच्या अनुपस्थितीमुळे मुलांच्या होणाऱ्या नुकसानीने पालक त्रस्त झाले आहेत. शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येथील पालकांसह शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी गुरुवारी पंचायत समिती कार्यालयाला धडक दिली. यावेळी गटविकास अधिकारी जगताप यांनी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.