संगमेश्वर:-“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या अभियानांतर्गत महाविद्यालयात एक दिवसीय संवाद कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक, लेखक, समीक्षक व उत्तम अभिवाचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ वंदना बोकील-कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचन, लेखन व संभाषण कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. या कलांमध्ये कौशल्य प्राप्त केल्यास करियरच्या विविध संधी कशा प्राप्त होतात याची अनेक उदाहरणे दिली. मातृभाषेची सशक्त परंपरा पुढे न्यायची असेल, तर ती सजगतेने वापरणे आवश्यक आहे. प्रत्येक दशकातील साहित्यकृतींची भाषा, नवनवीन चळवळी व प्रवाह यांनी सकस होत जाणाऱ्या साहित्यकृती वाचल्या पाहिजेत. तरच आपली भाषा समृद्ध होते, आपले लेखन सकस होते असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतातून वाचन, लेखन, संभाषण कला उत्तम रीतीने संपादन केल्यास व्यक्तिमत्त्व विकसित होण्यास मदत होते, तेव्हा अशा कार्यशाळांचा विद्यार्थ्यांनी स्वविकासासाठी उपयोग करून घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. वर्षा फाटक यांनी डॉ. बोकील-कुलकर्णी यांचा परिचय करून दिला आणि प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी आभार मानले. प्रा. स्नेहलता पुजारी, प्रा. अजित जाधव, प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. विकास शृंगारे, सहाय्यक स्वप्निल कांगणे व रोशन गोरूले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.