रत्नागिरी : नजीकच्या कुवारबाव येथे रिक्षा-दुचाकीत झालेल्या अपघात प्रकरणी रिक्षाचालकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची ही घटना 9 डिसेंबर 2024 रोजी घडली होती. संतोष दिलीप शिवगण (36) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
संतोष हा 9 डिसेंबर रोजी रिक्षा (एमएच 08 एक्यु 5013) घेवून कुवारबाव ते मिरजोळे आदर्शनगर असा जात होत़ा. कुवारबाव बाजारपेठ येथून जात असताना संतोष याने रिक्षाचा इंडिकेटर न दाखवता उजव्या बाजूला वळण घेतले. यामुळे मागून येणारी दुचाकी (एमएच 08 एडी 5406) रिक्षाला जोराने आदळल़ी. या अपघातात दुचाकीवरील अभिषेक तलवार (24) हा जखमी झाला. पोलिसांनी या अपघाताची नोंद करत रिक्षा चालक संतोष शिवगण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281,125 नुसार गुन्हा दाखल केला.