3 हजार 659 संशयित क्षयरुग्णांची नोंद
रत्नागिरी : जिल्ह्यात सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत जोखीमग्रस्त भागातील एकूण 1,59299 लोकसंख्येची तपासणी झाली. त्यापैकी 3,659 संशयित क्षयरुग्ण व्यक्ती आढळल्या. या संशयित क्षयरुग्णांपैकी अंतिम निदान झालेले 34 क्षयरुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा प्र. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जोखीमग्रस्त भागातील क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीव्दारे शोधण्यासाठी आरोग्य विभागामार्फत 23 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली. क्षयरोगाची लक्षणांमध्ये 2 आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, तसेच 2 आठवडयापेक्षा मुदतीचा ताप असणे, मागील 3 महिन्यात वजनात लक्षणीय घट होणे, मागील 6 महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडणे, मागील 1 महिन्यापासून छातीत दुखणे अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय दवाखान्यात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.