नाणीजसह येथील शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थांचा इशारा
मिऱ्या-नागपूर महामार्गप्रकरणी वेधले लोकप्रतिनिधींचे लक्ष
रत्नागिरी : मि-या – नागपूर महामार्गाचे काम वेगाने सुरु असून, महामार्गाची उंची वाढलेली असल्यामुळे गावाचे दोन भाग झाले आहेत. नाणीज बाजारपेठेतील बसथांब्याजवळ भुयारी मार्गाचा समावेश नसल्यामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ, रुग्णांना जवळपास 800 मीटरचा वळसा मारावा लागणार आहे. त्यामुळे बसथांब्याजवळ भुयारी मार्ग काढावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या बाबत ठोस निर्णय न झाल्यास 26 जानेवारी रोजी नाणीजसह या बसथांब्याचा वापर करणाऱ्या आणखी 3 ते 4 गावातील ग्रामस्थांनी रास्तारोको करण्याचा इशारा दिला आहे.
या बाबतचे निवेदन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, खासदार नारायण राणे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यानाही दिले. मिऱ्या – नागपूर महामार्ग नाणीज गावातून जात आहे. येथे रस्त्याची उंची वाढल्यामुळे आधीच गावाच्या महामार्गामुळे दोन भाग झाले आहेत. नाणीज गाव हा रत्नागिरीसह लांजा व संगमेश्वर या तीन तालुक्यांचाही केंद्रबिंदू आहे. नाणीज बसथांबा येथून घडशीवाडी, दरडीवाडी, शिरवली, नांदिवली, अंजणारी, चोरवणे, तळवाडी यासारख्या गावातही ग्रामस्थ प्रवास करीत असतात. नाणीज बसथांब्याजवळच अनेक व्यापाऱ्यांचे व्यवसाय आहेत. पंचक्रोशीची शाळा, कनिष्ट महाविद्यालय, वि.वि.स. सोसायटी, दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, बँक, मेडिकल स्टोअर्स असून ग्रामस्थांना मोठा वळसा पडणार आहे. हा बसथांबा जवळपास 70 वर्षापासून सुरु आहे. हा ग्रामदेवतेच्या पालखीचा हा पुरातन मार्ग असल्याने या थांब्याजवळ भुयारी मार्ग असावा, अशा ग्रामस्थांच्या भावना आहेत.
या महामार्गाच्या भरावामुळे ग्रामस्थांना आपली जनावरांना शेतीच्या ठिकाणी नेण्यासाठीही मोठा वळसा मारावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही धोका पत्करावा लागत आहे. त्यामुळे भुयारी मार्ग तत्काळ मंजूर करुन बांधून द्यावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
भुयारी मार्गासाठी नाणीज ग्रामस्थ एकवटले आहेत. शेतकरी, व्यापारी, ग्रामस्थांनी एकत्र येत मंगळवारी बैठक घेतली. ग्रामपंचायतीमध्येही या संदर्भात विशेष सभा पार पडली. त्यातही भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली. भुयारी मार्गासाठी लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनाचाही निर्णय घेण्यात आला. यासाठी वसंत रामा दरडी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. नाणीज जि.प. शाळा 1 समोर रास्तारोको करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.