चिपळूण : तालुक्यातील पिंपळी बु. येथील नुरानी मोहल्ला येथे एका 56 वर्षीय प्रौढाला पाचजणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या मारहाणीत प्रौढ जखमी झाला असून या प्रकरणी त्या पाचजणांवर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौज्जम शाबुद्दीन तांडेल, करामत बाबा तांडेल, मुबारक बाबा तांडेल, शाबुद्दीन तांडेल व त्याची पत्नी (पूर्ण नाव माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याची फिर्याद महम्मद जाफर अत्तार (56) यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महम्मद अत्तार यांच्या मालकीची पिंपळी बु. नुरानी मोहल्ला येथे जागा आहे. त्या जागेत 12 रोजी महावितरण कर्मचारी विजेचा खांब टाकत होते. त्या जागेतील आंब्याच्या झाडामुळे विद्युतखांब टाकण्यास अडचण होत असल्याने कर्मचाऱ्यानी अत्तार यांना ते तोडण्यास सांगितले होते. असे असतानाच मौज्जम तांडेल याने अत्तार यांना फोन करुन पिंपळी बु. येथील नुरानी मोहल्ला येथे भेटण्यासाठी बोलावले. त्या ठिकाणी अत्तार गेले असता त्यांचा त्याने मोबाईल रस्त्यावर आपटला. तसेच अत्तार यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाण प्रकरणी त्या पाचजणांवर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.