चिपळूण (वार्ताहर) : मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, वसंतराव भागवत माध्यमिक व कै. सौ.कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय, सेमी इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी देवी पद्मावती विद्या संकुल मार्गताम्हणे येथे सकाळी ८ वाजता चिपळूण आणि गुहागर तालुका मर्यादित भव्य अशा तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञानदानाचे भगीरथ प्रयत्न करणारी मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी, मार्गताम्हणे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाव्यतिरिक्त सामाजिक, राष्ट्रीय प्रवृत्ती जागृत व्हावी तसेच विद्यार्थ्यांमधून भावी आदर्श नागरिक तयार व्हावे यासाठी संस्कारात्मक विविध कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी करीत असते. त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी मार्फत दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धा ही वैशिष्ट्यपूर्ण असून देश समर्पित भावना व आरोग्यम् धनसंपदा या तत्त्वावर आधारलेली आहे. या स्पर्धेसाठी १० वर्षाखालील गटासाठी दोन किलोमीटर अंतर मर्यादा असून रोख बक्षीसे अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रूपये, १४ वर्षाखालील गटासाठी पाच किलोमीटर अंतर मर्यादा असून अनुक्रमे ४ हजार, ३ हजार, २ हजार रूपये, १८ वर्षाखालील गटासाठी ७ किलोमीटर अंतर मर्यादा असून ५ हजार, ३ हजार, २ हजार रूपये तसेच १८ वर्षावरील खुल्या गटासाठी अंतर मर्यादा १० किलोमीटर असून बक्षीसे अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रूपये आणि सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक व प्रशस्तीपत्र, सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. चिपळूण-गुहागर तालुक्यातील वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा या मॅरेथॉन स्पर्धेच्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात. यावर्षी आयोजित केलेली ही मॅरेथॉन स्पर्धा भव्य स्वरूपाचे आहे.
मार्गताम्हणे एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी तसेच डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव ,माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ लकेश्री यांनी चिपळूण- गुहागर तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, वरिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा यांना आवाहन केले आहे की, दि. २ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करून या राष्ट्रीय उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुण व शारीरिक विकासास प्रोत्साहन द्यावे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी सहभाग नोंदविण्यासाठी मॅरेथॉन कमिटीचे प्रा. डॉ. सत्येंद्र राजे (9422878705), राकेश खांडेकर (9049038443) यांच्याशी संपर्क साधावा.