चिपळूण एसटी बसस्थानकापासून महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरचा प्रकार
चिपळूण (प्रतिनिधी) : एस.टी. बसस्थानकापासून पुढे महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी काही दिवसापूर्वी रस्त्यालगत खडी टाकण्यात आली आहे. सद्यस्थितीत मोठ्या वाहनाच्या रहदारीमुळे ही खडी रस्त्यावर पसरु लागली असून वाहतुकीच्यादृष्टीने ही खडी धोकादायक ठरु लागली आहे. रात्रीच्यावेळी वाहनधारकाना या खडीचा अंदाज न आल्यास यातूनच अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर ठोस उपाय करण्याची मागणी होवू लागली आहे.
शहरातील इतर अंतर्गत रस्त्याप्रमाणे एसटी बसस्थानकापासून पुढे विरेश्वर तलाव तर महामार्गाला जोडणारा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने महत्वाचा बनला आहे. हा रस्ता बसस्थानक मार्गे थेट बाजारपेठेशी तर दुसऱ्या बाजूने महामार्गाला जोडत असल्याने वाहतुकीचा विचार करता कायम या रस्त्यावर वाहनांची रहदारी असते. पावसादरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून सद्यस्थितीत या खड्यांच्या वाढलेल्या विस्तारामुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. अशा स्थितीत प्रवास करताना वाहनधारकांना हे खड्डे डोकेदुखी ठरले आहेत. याविषयी सातत्याने ओरड होत असताना अधूनमधून नगर परिषदेकडून हे खड्डे भरले असले तरी काही दिवसानंतर ते पुन्हा उखडत असल्याचे चित्र होते. सद्यस्थितीत नगर परिषदेकडून हे खड्डे भरले जात असून त्यासाठी काही दिवसापूर्वी या रस्त्यालगत ठिकठिकाणी मोठी खडी टाकण्यात आली आहे. अनेक दिवस होवूनही खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात न झाल्याने यामुळे मोठ्या वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यालगतची खडी रस्त्यावर पसरु लागली आहे. पसरलेली खडी त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक ठरू लागली आहे. याशिवाय या रस्त्यावर अपुऱ्या विजेअभावी रात्रीच्यावेळी वाहनधारकांना या खडीचा अंदाज न आल्यास यातूनच अपघातही घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या रस्त्यावरील विरेश्वर तलावापासून पुढे हा रस्ता अरुंद आहे. एखाद्या वेळेस या अरुंद रस्त्यावरून मोठे वाहन जात असताना इतर वाहनांना पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यामुळे कायमच त्या ठिकाणी वाहतूककोंडीचे चित्र असते. अशात रस्त्यालगत टाकलेल्या खडीमुळे या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. यासाठी रस्त्यावर आलेली खडी रस्त्यावरुन बाजूला हटवण्यासाठी ठोस उपाय करण्याची मागणी होवू लागली आहे.