दोन गुंठे जागेतून ११० किलोचे उत्पन्न
दापोली:-कोळथरे (ता. दापोली) येथील साहिल सुनील पेठे याने शास्त्रीय पद्धतींचा वापर करत स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. तो सावर्डे येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. कृषी पदवी अभ्यासक्रमात भेटलेल्या ज्ञानाचा परिपूर्ण वापर त्याने केला. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेती हेच रोजगाराचे व उपजीविकेचे साधन म्हणून त्याने निवडले असून स्ट्रॉबेरीची लागड केली.
कोकणात हिवाळ्यात स्ट्रॉबेरीचे पीक उत्तम येऊ शकते. कोकणातही कृषी क्षेत्रामध्ये उत्तम रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात, हे त्याने या प्रयोगातून दाखवून दिले. साहिलने दोन गुंठे जमिनीवर नाबीया जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सरी पद्धतीने मल्चिंग पेपरचा योग्य वापर करत ३० बाय ४५ अंतरावर तब्बल एक हजार रोपे लावली आहेत.
वडील सुनील पेठे, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, प्रा. प्रशांत पवार, वर्गमित्र निखिल भिलारे व गणेश पवार यांनीही त्याला मार्गदर्शन केले. ८ नोव्हेंबरला त्याने दोन गुंठे जागेत स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. त्यातून त्याला ११० किलो स्ट्रॉबेरी मिळाली आहे. दापोलीच्या मार्केटमध्ये ४०० रुपये किलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री केली जाते. हे फळ तसे खूप नाजूक असल्याने याला कीटक व रोगांचा धोका आहे. यावर मात करण्यासाठी साहिलने एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अतिशय बारकाईने अभ्यास करत अवलंब केला आहे. जेणेकरून हे पीक उत्तमरित्या तग धरून राहील. या पिकाला लागणाऱ्या रासायनिक व जैविक खतांचा समतोल राखण्यात साहिल यशस्वी झाला आहे.