राजापूर:-शहरातील जवाहरचौक ते रानतळे या तीव्र उताराच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे आणि मोबाईल कंपनीची लाईन टाकण्यासाठी केलेले खोदकाम यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
त्यामुळे आधीच तीव्र उतार आणि अरूंद रस्त्यावरून वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करावे अन्यथा रस्ता बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला दिला आहे.
याबाबतचे निवेदन पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सूरज पेडणेकर, भाजपचा तालुका कोषाध्यक्ष विवेक गुरव, माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष अरविंद लांजेकर, शंकर सोलगावकर, अॅड. राजू देवरूखकर, शहबाज खलिफे आदी उपस्थित होते.
शहरातील जवाहरचौक ते रानतळे या रस्त्याने धोपेश्वर, गोवळ, शिवणे या गावांसह रत्नागिरीकडे जाणारी वाहने जा-ये करत असतात. त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते. हा रस्ता तीव्र उतार आणि अरूंद असून रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या दरम्यान या रस्त्यावरील खड्डे जांभ्या दगडाने भरले होते; मात्र त्यानंतर या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यामध्ये मोबाईल कंपनीची लाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे. यामुळे लोकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, निवेदनाद्वारे पालिकेकडे लक्ष वेधले आहे.