चिपळूण :’चूल आणि मूल’ची संकल्पना मोडीत काढत आजची स्त्री उद्योग-व्यवसायात गरूड झेप घेऊ लागली आहे. शासनाच्या उमेद अभियानाची साथ आणि बचतगटातील सामूहिक शक्तीच्या जोरावर महिलांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. यातूनच चिपळूण तालुक्यात महिला बचतगटांची संख्यादेखिल दिवसेंदिवस वाढत आहे. चिपळूण तालुक्यात २ हजार ७९० महिला बचतगट असून २७ हजार ८६१ एवढी महिला सभासद संख्या आहे. या महिलांना विविध व्यवसायाच्या माध्यमातून तालुक्यात ८ हजार १३२ महिलांना लखपती करण्याचे उमेद अभियानचे नियोजन आहे. तर डिसेंबर २०२४ अखेर लालुक्यात ५ हजार ४०० महिला ‘लखपती’ झाल्या आहेत.
महिला सबलीकरणाला चालना देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांच्या विकासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी शासनाने बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम होण्याचा मार्ग महिलांना उपलब्ध करून दिला आहे. त्यातून बचतगटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. तालुक्यात एकूण ९ प्रभागातून बचत गटाचे काम सुरू आहे. यामध्ये रामपूर बचत गटात २९२, मालदोली बचतगट ३९५, पेढे प्रभागात ३१८, सावर्डे प्रभागातून २२७, खेर्डी प्रभागात २०९, अलोरे प्रभागात ३५३ बचत गट, पोफलीमध्ये ३५६, कोकरे मध्ये २४४ बचतगट आणि कळंबट येथे २३७ बचत गट याप्रमाणे महिला बचतगटांचे तालुक्यात काम सुरू आहे. यासाठी तालुक्यात ठिकाणी तीन अधिकारी कर्मचारी आणि प्रभाग समन्वयक काम करत आहेत.
तालुक्यात एकूण २ हजार ७०० महिला बचत आहेत. यापैकी ५४०० बचतगट हे प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. तर उर्वरित महिला बचतगट हे हंगामानुसार व्यवसाय करीत आहेत, उमेद अभियानांतर्गत बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण होत आहे. उमेद अंतर्गत महिलांची आर्थिक समृद्धी साधून त्यांना लखपती करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार तालुक्यात ८ हजार १३२ महिलांना लखपती करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत विविध व्यवसायाच्या माध्यमातून ५ हजार ४०० महिला या लखपती झाल्या आहेत. याशिवाय तालुक्यात महिला बचत गटाच्या दोन कंपन्यांची स्थापनाही करण्यात आली आहे.
गारमेंट क्लस्टर आणि हाऊस बोट प्रकल्पाकडे लक्ष
पेढे प्रभागात हिरकणी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून गारमेंट क्लस्टर उभारण्यात येत आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून १६५ महिला जोडल्या गेल्या आहेत. तर मालदोली प्रभागात मालदोली कोकण क्रांती महिला शेतकरी उत्पादक कंपनीत ६६८ महिलांचा सहभाग राहीला आहे. या गटाच्या माध्यमातून दामोळ खाडीत हाऊस बोट्या प्रकल्प राबविण्यात येणार असून तो अंतिम टण्यात आहे. महिनाभरात हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.